पंढरपूर : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान जसा विठुराया आहे तेवढेच त्याचे आराध्य चंद्रभागा माता असल्याने लाखो विठ्ठल भक्त आधी पवित्र चंद्रभागेत स्नान करतात आणि मगच देवाच्या दर्शनाला जातात. याच चंद्रभागेतील 210 वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोधार करण्याचा निर्णय झाला असून वारकरी संतांच्या उपस्थितीत त्याचे पूजर पार पडले. 

Continues below advertisement


'जेव्हा नव्हते चराचर तेंव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा  गंगा, तेंव्हा होती चंद्रभागा'असे चंद्रभागेबाबत उल्लेख अनेक पुराणात आढळतात . मात्र आज या चंद्रभागा नदी आणि चंद्रभागा मंदिराची दुरावस्था झाली आहे. याच चंद्रभागेचे एक पुरातन मंदिर चंद्रभागा घाटावर असून आज त्याच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. 


चंद्रभागा तीरावर 210 वर्षांपूर्वी चोपडेकर महाराज यांनी हे चंद्रभागेचे मंदिर आणि चंद्रभागा घाटाची उभारणी केली होती. एवढे पुरातन मंदिर असूनही हजारो वारकऱ्यांना हे नेमके कसले मंदिर आहे याची माहिती नव्हती. पुरातन अशा या चंद्रभागा मातेच्या मंदिराची होत असलेली पडझड रोखून तिचा जीर्णोद्धार करण्याची भूमिका वारकरी पाईक संघाचे राणा महाराज वासकर यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या शेखर मुंदडा यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ या कामाला होकार दिला आणि आज याचा शुभारंभ करण्यात आला. 


या मंदिराचे पुरातत्व महत्व राखत केवळ झिज होत चाललेल्या मंदिराचा जीर्णोद्धार त्याच पद्धतीने करण्याची भूमिका आहे. याच सोबत या मंदिर परिसराचा विकास करण्याचा संकल्प आज सोडण्यात आला. या मंदिराची उभारणी करणाऱ्या चोपडेकर महाराज मठातील मठाधिपती आणि प्रतिनिधी देखील यासाठी उपस्थित होते. 


दुसऱ्या बाजीरावाने जेव्हा चंद्रभागेवरील घाट आणि तटबंदी बांधायला सुरुवात केली होती त्याच वेळी हे चंद्रभागा मातेचे मंदिर विदर्भातील संत चोपडेकर बुवा यांनी उभारले होते. मात्र कालांतराने याकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्याचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मंदिराजवळ त्याचा इतिहास लिहिला जाणार असून स्नान करून आलेल्या महिलांना कपडे बदलण्याची जागा, भाविकांना बसण्याची व्यवस्था येथे होणार आहे. याच सोबत पुन्हा हरिद्वारच्या धर्तीवर चंद्रभागेच्या आरती सुरु करण्याचा संकल्प आज सोडण्यात आला.  


महत्त्वाच्या बातम्या :