Pandharpur Vitthal Rukmini Temple : पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर गेले 28 युगे उभा असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यात आता सोने चांदीच्या विटा येणार आहेत. गोरगरीब भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेलं तब्बल 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीचे दागिने देवाच्या खजिन्यात आहेत. यातील हजारो लहान लहान दागिने सांभाळणं मंदिरासाठी जिकिरीचं बनल्यानं हे लहान दागिनं वितळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हे दागिने वितळविण्यासाठी शासनानं अधिकारी नेमला असून मंदिर समितीनं देखील तीन सदस्यांची नियुक्ती निश्चित केली आहे. या सदस्यांमध्ये मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य भास्करगिरी महाराज, शिवाजी महाराज देहूकर आणि संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. त्यामुळे देवाच्या हजारो लहान दागिन्यांना वितळवून त्याच्या सोन्या-चांदीच्या विटा करण्याचा निर्णय आता मार्गी लागणार आहे. 


राज्य शासनानं सोने वितळविण्यासाठी परवानगी देताना हे सोनं विकणं, त्याच्या विटा करवून त्या बँकेत ठेवणं अथवा त्याचे नवीन दागिनं बनविण्यास परवानगी दिलेली होती. आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सोनं-चांदी वितळवून त्याच्या विटा बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.      


गेल्या 36 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अत्यंत जोखमीचा प्रश्न मार्गी लागला आहे. गोरगरीब भाविकांनी अर्पण केलेले हे लहान दागिने देवाला वापरता येत नसल्यानं ते गेली वर्षानुवर्षे पोत्यात बांधून खजिन्यात ठेवण्यात आले होते. या लहान दागिन्यांत 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीचे दागिने आहेत. आता राज्य सरकारनं दिलेल्या परवानगीनुसार, औरंगाबाद येथील विधी आणि न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे यांच्या उपस्थिती तीन मंदिर समिती सदस्य आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी अशा पाच जणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली हे सोनं-चांदी वितळविण्याचं काम मुंबई येथील केंद्र सरकारच्या रिफायनरी मध्ये केले जाणार आहे. 
       
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, सध्या देवाकडे असलेल्या 28 किलो सोन्यापैकी 9 किलो सोन्याचे दागिने देवाला वापरता येण्यासारखे असल्यानं ते ठेवले जाणार असून 19 किलो सोनं वितळविण्यात येणार आहे. तसेच एकूण 996 किलो चांदीपैकी 571 किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार असल्यानं 425 किलो चांदी वितळविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यासाठी पाच जणांच्या समितीच्या देखरेखीखाली सोनं आणि चांदीच्या दागिन्यातील दोरे, खडे, हिरे, माणके हे वेगळे करून व्यवस्थित ठेवलं जाणार आहे.  


उरलेलं सोनं आणि चांदी यांचा विमा उतरवून हे सर्व चोख सुरक्षा व्यवस्थेत मुंबई येथे वितळविण्यासाठी नेलं जाणार आहे. सुरुवातीला सर्व सोनं आणि चांदी वितळवून त्याचे दोन-दोन सॅम्पल तुकडे बाजूला काढले जाऊन मग सर्व सोन्या-चांदीचं शुद्धीकरण केलं जाईल. शासन आदेशानुसार, या दागिन्यांतून निघणाऱ्या शुद्ध सोन्या आणि चांदीच्या विटा बनविण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जातील. या तयार होणाऱ्या सोन्या-चांदीच्या विटा बँकेत ठेवल्यानं यावरील व्याज समितीला मिळणार असून ज्यावेळी गरज आहे. त्यावेळी यातील सोने अथवा चांदी मोडून नवीन दागिने करण्याचा अधिकार मंदिर समितीकडे असणार असल्याचं मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा