Palghar Crime News : बोईसर शहरात दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह तारापूर औद्योगिक क्षेत्रात सापडल्यानं खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळच्या वेळी अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं जलदगतीनं फिरवली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सायंकाळपर्यंत यातील आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.


बोईसर धोडीपुजा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या पाठीमागे राहत असलेल्या 5 वर्षीय आयुष बलराम नायक हा दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अंगणात खेळत असताना काही वेळानं मुलगा आयुष अंगणात दिसेनासा झाल्यानंतर आईसह नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला होता. उशिरापर्यंत मुलगा सापडला नसल्यानं घरच्यांनी बोईसर पोलीस ठाणं गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस आणि नातेवाईक आयुष याचा शोध घेत असताना दोन दिवसानंतर बुधवारी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रुचिरा बारच्या बाजुला असलेल्या नाल्याच्या वर पाय बांधलेल्या स्थितीत आयुषचा मृतदेह सापडला.


बोईसर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमनं आरोपीचा मागोवा घेण्यासाठी दिवसभर शोधकार्य सुरू केलं. या घटनेत सुरुवातीला दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीत काही निष्पन्न झालं नसल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमनं मयत झालेल्या मुलाच्या बाजूला राहत असलेल्या एकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आरोपींबाबत माहिती देण्यासाठी नकार दर्शविला. आरोपीला अटक केल्याबाबत आणि अधिक माहिती पत्रक काढून देणार असल्यानं बोईसरमधील पोलिसांनी माहितीची गुप्तता पाळली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह