Medical Girl Student Missing in Mumbai : मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. ही तरुणी 22 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाली आहे. सदिच्छा साने असे या तरुणीचे नाव असून प्रीलियम परीक्षेसाठी ही तरुणी मुंबईत आली होती. सदिच्छाचे अपहरण झाले असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 


वैद्यकीय शिक्षण घेणारी सदिच्छा मनीष साने ही तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली होती. मात्र, ती 29 नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदिच्छा साने ही 22 वर्षीय तरुणी बोईसरमधील खोदाराम बाग येथे राहत होती. ग्रँट मेडिकल कॉलेमध्ये शिक्षण घेणारी सदिच्छा प्रीलियमची परीक्षा देण्यासाठी ती मुंबईला गेली होती. मात्र, ती घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. 


दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या प्रीलियमच्या पेपरलाही सदिच्छा पोहचली नसून तिचा अचानक फोन बंद आला असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. सदिच्छाच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हे वांद्रे बॅंडस्टॅंड येथे दाखवण्यात येत आहे.  त्या ठिकाणी तिला पाहणारा शेवटचा एक जीवरक्षक असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.  सदिच्छासोबत जीवरक्षकानेही सेल्फी काढला असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. तिचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी योग्य दखल घेऊन सदिच्छाचा शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha