चार वर्षांची असताना जे.जे. रुग्णालयात सापडलेल्या चिमुकल्या मुलीच्या पंखाना मोठे बळ मिळाले आहे.  बदलापूरच्या आश्रमशाळेत राहणाऱ्या शबाना शेख या विद्यार्थिनीनं एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. तिच्या या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तिचा सत्कार केला. शबानाच्या या यशाबद्दल सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


शबाना शेख ही विद्यार्थिनी बदलापूरच्या बॉंबे टीन चॅलेंज या संस्थेच्या आश्रमशाळेत राहते. शबाना चार वर्षांची असताना ती या संस्थेच्या स्वयंसेवकांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये सापडली होती. तेव्हापासून ती याच आश्रमशाळेत वास्तव्याला आहे. या आश्रमशाळेत राहून तिनं बदलापूरच्या आयईएस कात्रप विद्यालयातून दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. तर पुढे अंबरनाथच्या साऊथ इंडियन कॉलेजमधून तिनं विज्ञान शाखेतून १२ वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 'नीट' ही प्रवेशपरीक्षा देऊन तिनं जिद्दीनं एमबीबीएसला प्रवेश मिळवला. 


औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शबानाला प्रवेश मिळालाय. यासाठी ठाणे जिल्हा महिला बालकल्याण विभागानं तिला अनाथ असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं. तिच्या या यशानंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तिचा विशेष सत्कार केला. तसंच पुढे काहीही मदत लागली, तर हक्काने सांग, आम्ही मदत करू, असं म्हणत शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असं ध्येय ठेवण्याचा संदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी शबानाला दिला. यानंतर शबानानं सर्वांचे आभार मानले. 


संस्थेने केली शिक्षणासाठी तरतूद


शबाना ज्या बॉंबे टीन चॅलेंज संस्थेच्या आश्रमशाळेत राहून शिकली, त्या संस्थेनं शबानाला मोठं होऊन काय व्हायचंय, या दृष्टीने आधीपासूनच तयारी केली होती. आता तिच्या इच्छेनुसार एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतरही तिच्या शिक्षणाची सर्व प्रकारची आर्थिक तरतूद या संस्थेनं करून ठेवलीये. त्यामुळं शबानाला कोणतंही टेन्शन न घेता अभ्यास पूर्ण करता येणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI