Wardha News वर्धा : नागपूरहून (Nagpur) पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा बुलढाणा (Buldhana Accident) जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे एक वर्षापूर्वी भीषण अपघात झाला होता. समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा कदाचित सर्वात मोठा अपघात ठरला असावा. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले असून आजही त्या अपघाताची दाहकता अनेकांना हादरून देणारीच ठरली आहे.


एक वर्षापूर्वी घडलेल्या या अपघाताला आज वर्ष पूर्ण होत असल्याने यातील 25 मृतकांच्या कुटुंबाने वर्ध्यात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्यावर सामूहिक वर्षश्राद्ध केले आहे. यावेळी शासनाने देऊ केलेल्या 25 लाख रुपयांच्या मदतीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. खासदार अमर काळे या वर्षश्राद्ध आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी शोकाकुल  वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.


यापेक्षा शरमेची गोष्ट कोणत्या सरकारसाठी नसावी- अमर काळे


नागपूरहून पुण्याला येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्यानं बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसनं अचानक पेट घेतला. त्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. तसेच शासनाकडून मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शासनाचा निषेध म्हणून सर्व मृतकांच्या कुटुंबाला आज रस्त्यावर वर्षश्राद्ध करावे लागले,  यापेक्षा शरमेची गोष्ट कोणत्या सरकारसाठी नसावी.अशी प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारचे रस्त्यावर वर्षश्राद्ध करण्याची वेळ या पीडित कुटुंबावर या शासनाने आणली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, असेही खासदार अमर काळे यावेळी म्हणाले.


समुद्धी महामार्गाच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात


समृध्दी महामार्गावर बुलढाणा - सिंदखेड राजा 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले होते. 30 जूनच्या मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. 25 प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची (vidarbha travels) खासगी बस होती. बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती. कुणी शिक्षणासाठी घर सोडून पुण्याची वाट धरली होती तर कुणी नोकरीचा दिवस भरण्यासाठी आई-बाबांचा निरोप घेवून जन्मभूमी सोडून कर्मभूमीची वाट धरली होती.  त्यांना कुठं ठावूक होतं की हा निरोप शेवटचा असेल.


पीडित कुटुंबाचा मात्र अद्याप संघर्षच!


तिकीट काढताना त्यांना वाटलंही नसेल, त्यांचा हा प्रवास शेवटचा असेल समुद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात ठरला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लक्ष रुपये मदतीची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात राज्याकडून 5 लाख तर केंद्राकडून 2  लाखांचीच मदत मिळाली. शिल्लक मदतीसाठी वारंवार सत्ताधाऱ्यांना भेटल्यावरही काहीच झाले नाही. घटनेनंतर आरोपींवर कमकुवत कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने त्यांना लगेच जामीन मिळाला. मात्र यातील पीडित अद्याप या अपघातातून सावरले नसून प्रशासनानेही त्यांची अवहेलनाचं केल्याची प्रतिक्रिया अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या