Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणी प्रक्रियेत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पहिल्या फेरीत जोरदार रस्सीखेच
नुकतीच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदिप गुळवे, महायुतीचे किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सर्वच टेबलवर चुरशी लढाई सुरू आहे.तीनही उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. मात्र कोटा पद्धतीमुळे निकाल यायला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमध्ये मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकमेकांची मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी अक्षरात 1 आकडा काढला असेल तर त्याला इंग्रजी 9 समजून आक्षेप घेतला जात आहे. हस्ताक्षरातील चूका शोधून मत बाद ठरविण्याकडे कल आहे. आक्षेप घेतलेले मत डाऊटफुल बॉक्समध्ये टाकले जात आहेत. ज्या मतांवर आक्षेप आहे त्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या पसंती क्रमांकांना रिंगण केले किंवा एकच पसंती क्रमांक दोन उमेदवाराला दिले असे मत बाद ठरविले जात आहेत. बाद मते रिजेक्ट बॉक्समध्ये टाकली जात आहेत.
मतमोजणी प्रक्रियेत आढळल्या जास्त मतपत्रिका
मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या