Ahmednagar News : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या पीएवरीवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश शेटे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. शेटे याला नेवासा तालुक्यातील हनुमानवाडीतून पोलिसांनी अटक केली.
मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी गोळीबार झाला होता. या प्रकरणी आधी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. नितीन विलास शिरसाठ याला या आधी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावून 25 एप्रिल रोजी पोलिसांनी शिरसाठ याला ताब्यात घेतले होते.
नेमकं काय घडलं?
शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे हे सोनई येथील काम आटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी परतत होते. यावेळी ते आपल्या मोटारसायकलवरुन निघाले होते. दरम्यान, तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकलवरुन त्यांच्या मागावर आले होते. राहुल राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच, या अज्ञात आरोपींनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार करुन, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राहुल यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली. तर, डाव्या हाताला देखील एक गोळी चाटून गेली.
शंकरराव गडाखांनाही जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, राहुल राजळे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शंकरराव गडाख यांच्यासह त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे त्यात दोन व्यक्ती फोनवर सांभाषण करत आहेत त्यातील एक व्यक्ती आपल्याकडे अशी काही माणसं आहेत ज्यांना सांगितले तर शंकररावला घरात जाऊन ठोकतील अशा आशयाचे सांभाषण आहे.
महत्वाच्या बातम्या