Ahmednagar News : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. 22 एप्रिलला रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास नेवासे तालुक्यातील लोहगाव येथे ही घटना घडली. या घटनेत राहुल राजळे जखमी झाले आहेत. नितीन विलास शिरसाठ अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल राजळे  यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे


 पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या  नितीन विलास शिरसाठ  या  आरोपीवर विविध पोलिस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  शेवगाव बस स्थानक परिसरात सापळा लावून पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.


नेमकं काय घडलं?


शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे सोनई येथील काम आटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी परतत होते. यावेळी ते आपल्या मोटारसायकल वरुन निघाले होते. दरम्यान, तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकल वरुन त्यांच्या मागावर आले होते. राहुल राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच, या अज्ञात आरोपींनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार करुन, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात राहुल यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली. तर, डाव्या हाताला देखील एक गोळी चाटून गेली आहे.


राहुल राजळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रतिक्रिया देताना राहुल राजळे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे, मागील काही दिवसांपासून माझ्याबाबत आणि माझ्या कुटुंबियांबाबत शिवराळ भाषेत टीका होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राहुल राजळे यांच्यावरील हल्ला म्हणजे माझ्यावरील हल्ला आहे असं गडाख म्हणाले.मागील काही दिवसांपासून नेवासा तालुक्यातील राजकारण अतिशय खालच्या पातळीवर घसरले असून हे दुर्दैवी आहे.पण माझा पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.