Heat wave : राज्यात सध्या उन्हाचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या उन्हाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी आज  (9 एप्रिल) आणि उद्या (30 एप्रिल) ला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.


एकीकडे विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे मात्र, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, तसेच कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मेघगर्जना होण्याचा अनुभव येत आहे. दरम्यान देशातील, बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे. विदर्भात या महिन्यातील तिसरी उष्णतेची लाट आली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई उपनगरांसह कोकण विभागात पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


दरम्यान, राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. मुंबईजवळील काही भाग आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक भागात तापमान विदर्भाप्रमाणे 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण एप्रिलमध्ये उन्हाचा तीव्र चटका होता, आता महिन्याचा शेवटही तीव्र उष्णता जाणवत आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे. या महिन्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या. मुंबई आणि उपनगरांमध्येही एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. 


एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाच्या पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच यंदाचा एप्रिल महिना देशातील उकाड्याचे सर्व विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भारतातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर जेवढं तापमान असतं तेवढं तापमान एप्रिल महिन्यात वाढलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: