Mumbai–Pune Expressway : मुंबई एक्स्प्रेस वे वरुन दररोज तब्बल अकरा हजार  वाहने टोल न देता प्रवास करत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून करण्यात आलाय.  त्यामुळे टोलमध्ये झोल केला जातो या दाव्याला आणखी बळ मिळतय.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून त्यांच्या वेबसाईटवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.


पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती आयुक्तांकडे पुणे- मुंबई एक्स्प्रेस वे वरुन दररोज किती वाहने प्रवास करतात याची माहिती जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर माहिती आयुक्तांच्या निर्देशांनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.  टोल न देता प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये exempt  म्हणजे ज्यांना सुट आहे अशी वाहने आणि violeters म्हणजे टोल चुकवून जाणारी वाहने यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय.  पण यातील exempt किती आणि violators किती हे मात्र सांगण्यात आलेले नाही.  


नुकतीच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर  2021 ची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे दिसून येते. 


ज्यांना टोल मधून सुट आहे अशी आमदार खासदार , पोलीस,  रुग्णवाहिका , मिलीटरी वाहने अशी दररोज दहा हजार वाहने एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करत असतील अशी शक्यता नाही.  त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून देण्यात आलेली ही आकडेवारी संशयास्पद असल्याचा आरोप विवेक वेलणकर यांनी केलाय. विवेक वेलणकर यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.


विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र-


प्रति 
मा. मुख्यमंत्री , 
महाराष्ट्र राज्य


विषय : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रोज अकरा हजार वाहने टोल न देता जात असल्याच्या आकडेवारीची चौकशी करावी


मा. महोदय , 
    २०१६ साली मी मुख्य माहिती आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरून मुख्य माहिती आयुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोल नाक्यांवरून रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात ती संख्या व टोलची रक्कम याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. नुकतीच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे दिसून येते. डिसेंबर २०२१ या पूर्ण महिन्यात एकूण ३,३०,७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरून प्रवास केला. यात exempt आणि violators अशा दोन कॅटेगरी मधील वाहने असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र यातील exempt किती व violators किती याचा तपशील मात्र जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेला नाही असा संशय येतो. मुळातच रोज दहा हजारांहून अधिक रुग्णवाहिका ,  पोलिस / मिलिटरी वाहने , आमदार / खासदार वगैरे या रस्त्यावर प्रवास करत असतील ही शक्यता शून्य आहे. आणि त्यातही १८५० बसेस , ५१९३ ट्रक , ५०८६ मल्टीऍक्सल , २०१९६ LCV या exempt category मध्ये असू शकत नाहीत. याचाच अर्थ रोज काही हजार वाहने टोल चुकवून ( violators) जातात . हे केवळ अशक्य आहे हे या रस्त्यावर प्रवास करणारे लहान पोर ही सांगू शकेल. त्यामुळे हे सगळंच संशयास्पद वाटते. मात्र कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील आधिकार्यांना यात काही वावगं वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. 
     आपणास विनंती की यापुढे exempt आणि violators या दोन्ही category चे आकडे स्वतंत्र प्रसिध्द करावयाचे आदेश कंत्राटदाराला द्यावेत तसेच  violators या सदरात टोल चुकवून वाहने जाण्याच्या संशयास्पद प्रकाराला जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांची चौकशी करावी. 
आपल्या सक्रीय सहकार्याच्या प्रतिक्षेत , 
----- विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे


प्रत : मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mumbai Local Mega Block : 4 ते 6 फेब्रुवारी, मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक; पाचवी-सहावी मार्गिका 6 फेब्रुवारीला खुली होणार



Mumbai Local Update : लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेसाठी उचलण्यात आलेल्या 'या' पाऊलामुळे प्रवास होणार सुखकर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha