Dhule Sakri Latest Update : साक्री नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गालबोट लागल्याचं पाहायला मिळालं. माहितीनुसार निकालानंतर भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी शिवसेनेचे गोटू जगताप हे आपल्या मोटरसायकलने जात असताना त्यांच्यात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला या वादाचे पर्यावसन काही वेळात हाणामारीत झाले.


दरम्यान हा वाद सुरू असताना गोटू जगताप यांच्या बहीण मोहिनी नितीन जाधव या वाद सोडविण्यासाठी आल्या होत्या. यावेळी मोहिनी जाधव त्या खाली पडल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोटू जगताप यांच्या मातोश्री ताराबाई जगताप या निवडणुकीत पराभूत झाल्याने  त्यातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 


भावाला मारहाण होत असताना मोहिनी जाधव मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असताना त्यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र मोहिनी जाधव यांच्या मृत्यू मागील कारण अद्याप समजू शकले नाही. 


शवविच्छेदनानंतर येणाऱ्या अहवालात मोहिनी जाधव यांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे साक्री येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha





 





 




महत्वाच्या बातम्या