मुंबई : मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी (OBC Reservation) होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC मैदानात लढायला नव्हते. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले. आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भापचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांनी केली आहे.
ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित,"सन्मान सावित्रीच्या लेकींचा"या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर टीका केली. आव्हाड यांच्या या वक्तव्याला गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले. पडळकर म्हणाले, "आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही. पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला आणि वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होतं. हा ओबीसींचा इतिहास आव्हाडांना माहीत नाही का? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.
पडळकरांची अजित पवार यांच्यावरही टीका
"मागचं दीड वर्ष फक्त केंद्राच्या नावाने ओरड केली. पण आता यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. सध्या ते काय करत आहेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्यमागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत," अशी टीका आमदार पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ना न घेता केली.
...तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या
मंत्री आव्हाड यांच्यावर टीका करताना आमदार पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकराला आव्हान दिले. "ओबीसींबर एवढे प्रेम असेल तर सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या आणि त्यांना निवडून आणणार का? असा प्रश्न यावेळी पडळकर यांनी उपस्थित केला.
Gopichand Padalkar :Jitendra Awhad प्रस्थापितांना खुश करण्यासाठी कंत्राटी कामगार, पडळकरांचा हल्लाबोल
महत्वाच्या बातम्या
- OBC Reservation : OBC वर माझा फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड
- OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षणावरुन चंद्रशेखर बावनकुळेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, हस्तक्षेप याचिका दाखल करणार
- Maharashtra Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची मात्र तयारी पूर्ण