Resident Doctors Protest : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला आहे. सोमवारी संपकरी निवासी डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांबरोबर व्हिडीओ कन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाल्याने निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. पदव्युत्तरच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे नीटचे (NEET) समुपदेशन रखडल्याने 27 नोव्हेंबरपासून देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी चर्चा झाल्यानंतर देशातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते.मात्र, महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप कायम ठेवला होता.


संपकरी निवासी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांबरोबर झालेल्या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला. नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटी पद्धतीनं निवासी डॉक्टरांची नियुक्ती होणार आहे. शिवाय, निवासी डॉक्टरांना लवकरच कोविड भत्ता (रुणानुबंध भत्ता) मिळणार सोबतच अनेक कॉलेजेसमध्ये निवासी डॉक्टरांना स्टायपेंड वेळेवर मिळत नाही ह्यासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच नीट-पीजी काऊंसिलिंग प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन असल्याने नॅशनल मेडिकल काऊंसिल कमिटीकडून सांगितल्या प्रमाणे निर्णय होणार आहे.


देशात निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतल्यानंतरही महाराष्ट्रात संप होता. या संदर्भात सेंन्ट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले होते की, ''जोपर्यंत स्टेट काऊन्सिलिंगचा मुद्दा मार्गी लागत नाही, सोबतच एचओच्या पोस्ट भरल्या जात नाहीत, तोपर्यंत संप सुरुच राहणार.'' त्यानंतर अखेर आज महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.


महत्त्वाच्या बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha