मुंबई  : मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी (OBC Reservation) होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC मैदानात लढायला नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचंच नसतं. कारण ओबीसींवर ब्राह्माण्य वादाचा पगडा बसला आहे. पण त्यांना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे OBC वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.   


ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित, "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड बोलत होते. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आता आरक्षणाच्या निमित्ताने का होईना ओबीसी पुढे येत आहेत. पण नुसतं पुढं येऊन आणि घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागेल. सरकारशी दोन हात करावे लागतील. आज ओबीसी समाजाची 50 टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. तरीही हा महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं". 


ठाण्यामध्ये आग्र्यांची संख्या 5 ते10 टक्के आहे. परंतु त्यांचे नगरसेवक किती आहे? असा प्रश्न करत आव्हाड म्हणाले, समाजावर भूमीपुत्रांचा एक वेगळा पगडा असतो. परंतु, त्यांना लढायचं नाही, जे मिळेल ते घ्यायचं, असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी वृत्ती असते. ओबीसी बांधवांसाठी असे मेळावे घेणे सोपं आहे. परंतु, असे मेळावे घेऊन चालणार नाही. मैदानात उतरुन केंद्र सरकारला सांगावं लागेल की, आमचं आरक्षण तुम्हाला काढता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला संसदेमध्ये बिल आणावं लागेल. 50 टक्क्यांची मर्यादा उडवावी लागेल. त्याबरोबरच शोषित, मागासांना न्याय द्यावा लागेल असे आव्हाड म्हणाले. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की, आरक्षण हे दारिद्र्य निर्मूलनाचं काम नाही. पण जे शोषित, वंचित आहेत, ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येता आलं नाही, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षण द्यावंच लागेल असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. 


Jitendra Awhad on OBC : जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढण्यासाठी मैदानात नव्हते : जितेंद्र आव्हाड



महत्वाच्या बातम्या