बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन सध्या राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. याप्रकरणी दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. अशातच या प्रकरणावरुन संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री संजय राठोड यांनी काल (रविवारी) मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला. दरम्यान आता कोण काय बोलतंय हे माहित नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत, अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिली आहे. तसेच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून पाच कोटी रुपये घेतले असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणावर बोलणं मात्र पूजा चव्हाणच्या वडिलांनी टाळलं आहे.
पूजा चव्हाणच्या वडिलांनी बोलताना सांगितलं की, "आता कोण काय बोलतंय हे माहित नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत." मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बदनामी थांबली नाही, अशी खंतही पूजाच्या वडिलांनी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच संजय राठोड यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या आजींबाबत बोलताना, त्या आमच्या दूरच्या नातेवाईक आहेत, मात्र आमच्यात कसलेच नातेसंबंध नाहीत, असं पूजाच्या वडिलांनी सांगितलं.
मी आता थकलोय कृपया आता तरी बदनामी थांबवा, अशी आर्त हाक पूजा चव्हाणच्या वडिलांनी पुन्हा एकदा दिली आहे. तसेच पूजासाठी न्याय मागणाऱ्या आणि संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या तृप्ती देसाई, शांताबाई राठोड, चित्रा वाघ यांना पूजाच्या वडिलांनी भावनिक आवाहन केलं आहे. पूजा ही तुमच्या लेकीसारखी होती, न्याय द्या, तिची बदनामी करू नका, असं आवाहन केलं आहे.
"मी पोहरादेवीला जाणार होतो. राजीनाम्यानंतर संजय राठोड यांना भेटलो नाही. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती. पूजाच्या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांची गय केली जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मला दिलं आहे.", असं पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी दिलं आहे.
पाहा व्हिडीओ : संजय राठोडांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रक्कम दिली, पूजाची चुलत आजी शांता राठोडांचा आरोप
पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, आजी शांताबाई राठोड यांचा गौप्यस्फोट
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान आता शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली आहे.
शांताबाई म्हणाल्या की, ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, आजी शांताबाई राठोड यांचा गौप्यस्फोट
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार, चुलत आजी पोलिसात, म्हणाल्या, पूजाचा खून झालाय!
- Sanjay Rathod | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया
- Sanjay Rathod | संजय राठोडांवर अद्याप गुन्हा का नोंद केला नाही? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल