मुंबई: संजय राठोड यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. एफआयआर, ऑडियो क्लिप आणि इतर सारे पुरावे असूनही त्यांना अटक का केली नाही असाही सवाल त्यांनी केलाय.
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास दीड तासांची चर्चा झाल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "राज्याने या प्रकरणाकडे केवळ पूजा चव्हाण आणि संजय राठोड असं बघू नये. हा प्रश्न राज्यातील सर्व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, समाजाला ढाल करुन कशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे असंच सुरु राहीलं तर राज्यातील कोणत्याही मुलीला न्याय मिळणार नाही."
आयुष्याचे स्वप्न बघायच्या वयात, अवघ्या 22 वर्षाच्या मुलीच्या जीवनाची संजय राठोड या नराधमाने माती केली असा आरोप करत चित्रा वाघ म्हणाल्या की, "नुसता राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही. संजय राठोडवर गुन्हा दाखल करावा."
Sanjay Rathod | मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा
संजय राठोडांवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. त्या म्हणाल्या की, "संजय राठोडने केवळ राजीनामा द्यावा हे ध्येय नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. एफआयआर, ऑडियो क्लिप आणि इतर सर्व पुरावे समोर असताना पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत? महिलांच्या सुरक्षेचा विषय हा राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे."
गेल्या 19 दिवसांपासून चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलंय. नवऱ्यावर गुन्हा दाखल केला म्हणजे चित्रा वाघ घरी बसेल या भ्रमात कोणी राहू नये असंही त्या म्हणाल्या. पहिल्या दिवसापासून पोलिसांची आणि सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्यावा आणि एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावा अशी मागणी केली.
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. बंजारा समाज निसर्गपूजक आहे, त्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. आपण गैरकृत्य करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हा प्रकार खपवून घेणार नाही."
Sanjay Rathod | केवळ राजीनामा नको, राठोडांना अटक करा; चंद्रकांत पाटील