मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला. पक्षाची बदनामी होत असल्याने राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.


संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यासाठी शनिवारी भाजपच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच एक मार्चपासून होणारे अधिवेशन चालू न देण्याचा इशाराही भाजपच्या नेत्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असा दबाव होता आणि अखेर संजय राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला.


भाजप नेते राम कदम हे संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेचा हा विजय आहे. संजय राठोडांचा राजीनामा म्हणजे सरकारची नामुष्की आहे. अधिवेशनात हा प्रश्न उचलला जाईल आणि उत्तरं देताना आपली कोंडी होईल त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय घेतलाय. उद्या अधिवेशन आहे आणि आज राजीनाम्याचा निर्णय होतोय, मग 15 दिवस हे सरकार झोपलं होतं का?"


Sanjay Rathod | मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा


विधापरिदषेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारची अब्रू वेशीवर टांगली. भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. पण राजीनामा दिला म्हणजे हा प्रश्न संपला नाही. सरकारला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. एफआयआर का दाखल केला नाही? याची सखोल तपासणी व्हावी. महंतांच्या दबावाला बळी न पडल्याने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन."


भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार या विषयावर म्हणाले की, "हे प्रकरणच संशयास्पद आहे. पुणे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद आहे. संजय राठोड यांचा राजीनामा हे पहिलं पाऊल आहे. या प्रकरणाची चौकशी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याकडून तपास करावा. या संबंधी सर्व पुरावे तपासावे. विरोधासाठी विरोध नाही तर या प्रकरणी निष्पक्ष चौकशी केली जावी."


भाजप नेते नितेश राणे म्हणाले, "जो नियम संजय राठोड यांना लावलाय तो न्याय दिशा सॅलिनी प्रकरणातील एका युवा मंत्र्याला लावण्यात आला नाही. नुसता राजीनामा घेऊन हा विषय संपणार नाही. पहिला संजय राठोडवर गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा. या संबंधी सर्व संबंधितांची चौकशी झाली पाहीजे."


Sanjay Rathod | संजय राठोडांवर अद्याप गुन्हा का नोंद केला नाही? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल