शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव नाही, राज्यात काय होईल सांगता येत नाही; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थिती माहिती त्यांना दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तर सत्तास्थापनेबाबत शिवसेनेकेडून अद्याप कोणताही प्रस्तान आला नसल्याचं पवारांनी सांगितलं.
नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सद्यस्थितीत सत्तास्थापनेचा आकडा आमच्याकडे नाही, मात्र राज्यात काय होईल ते सांगता येत नाही, असं म्हणत शरद पवारांनी राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखी वाढवला आहे.
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती काय आहे, याची माहिती सोनिया गांधींना दिली. सोनिया गांधी यांच्याशी चर्चेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करुन पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. सध्याचं राज्यातील वातावरण भाजप विरोधी आहे, असं सूचक वक्तव्य करुन एकप्रकारे भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
तर सत्तास्थापनेबद्दल अद्याप आम्हाला कुणी विचारणा केलेली नाही, म्हणत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, राज्यात शिवसेनेला त्यांच्या नेतृत्वात सरकार हवं आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जे सुरु आहे ते केवळ बार्गेनिंग गेम नाही, काही तरी सिरीयस सुरु आहे, असं पवारांनी म्हटलं.
महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. राज्यातील जनतेने आम्हाला विरोधीपक्षात बसण्याच कौल दिला आहे. सरकार स्थापन करावं एवढं संख्याबळ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे नाही. भाजप-शिवसेनेला बहुमत मिळालं असल्याने त्यांनी सरकार स्थापन करायलं हवं, असं पवारांनी म्हटलं.
VIDEO | खातेवाटपात समान वाटा देण्यास भाजप तयार : सूत्र