(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव नाही : वंचित बहुजन आघाडी
Rajya Sabha Election : काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे.
मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे. "काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. शिवाय निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो," असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे. याबाबत वंचितने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं?
वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, "वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरुन खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसकडून उमेदवारीची चर्चा : सूत्र
राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्यसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे consensus candidate असू शकतात का याचीही चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. या भेटीत येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये काही आघाडी होऊ शकते का याची चर्चा झाली. मात्र हे झालं पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी. स्वतः आंबेडकरांचे काय? असं कळतंय की ते राज्य सभेचे उमेदवार होऊ शकतात का, कोण समर्थन देईल आणि consensus हा होऊ शकेल का याचीही कुठेतरी चाचपणी सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.