Parinay Phuke भंडारा : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर याच मुद्द्यावरून आता राज्याचे राजकारण देखील ढवळून निघाले आहे. अशातच आज मनोज जरांगे पाटील यानी आपले उपोषण स्थगित घेत सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील यावेळी गंभीर आरोप केले आहे. याच मुद्यावरून आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि आमदार डॉ. परिणय फुके यांनी मोठं वक्तव्य करत मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली आहे. 


मी आधीही सांगितलं की, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण कोणीही देऊ शकत नाही आणि कोणी ते देण्याची हिंमतही करणार नाही. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, हा कोणाचाही अधिकार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोणत्या समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचं, हे आधीपासून ठरवलेलं आहे. आता याच्यावर कोणताही समाज ओबीसी, एससी किंवा एसटीमध्ये दाखल करता येणार नाही. निश्चितच मनोज जरांगे यांनी पुन्हा कायदा आणि संविधानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. परीणय फुके यांनी व्यक्त करत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबत करताना त्यांच्यावर टीका केली.


शेतकरी, ओबीसी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या हिताचा केंद्रीय बजेट 


या देशाच्या जनतेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपद दिलेलं आहे. तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलं अर्थसंकल्प आहे. अतिशय सुंदर असा हा अर्थसंकल्प आहे. पुढील पाच वर्षाची देशाची दिशा आणि दशा कशी राहणार आहे, हे या अर्थसंकल्पातून कळत आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत व्हावी, याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओबीसींना मदत व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदत व्हावी, अशा अनेक बाबींचा या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. निश्चितच सुंदर असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडल्याची प्रतिक्रिया विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर 
आपली प्रतिक्रिया देताना दिली.


लोकप्रियता घसरत असल्यानं जरांगे वैफल्यग्रस्त 


मला असं वाटतं की, जरांगे वैतागलेले आहेत आणि जी आधी त्यांची लोकप्रियता होती ती कुठेतरी आता घसरून राहिलेली आहे. म्हणूनच ते असं वैफल्यग्रस्त किंवा अशा प्रकारचे स्टेटमेंट नेत्यांच्या विरोधात देतात. जरांगेजींनी जो आपला उद्दिष्ट आहे तो स्पष्ट केला पाहिजे. त्यांना खरोखर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की, त्यांना काहीतरी मीडियामध्ये किंवा दिवसभर चैनल मध्ये यायचं आहे, हे ठरवावं, असा टोला डॉक्टर परीणय फुके यांनी मनोज जरांगे यांना लगावला आहे. 


हे ही वाचा