Manoj Jarange : 'शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे', असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाट्यनिर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं आहे. न्यादंडाधिकारी ए.सी बिराजदार यांनी हे अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी सांस्कृतिक मंत्रालयावरही काही सवाल उपस्थित केले आहेत.
जालन्यात 2013 मध्ये शंभूराजे या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक प्रयोगाचे पाच लाख, असे सहा प्रयोगांसाठी तीस लाख रुपये देणार असल्याचं आयोजकांकडून कबूल करण्यात आलं होतं. नाट्यनिर्मात्यांनीही त्याला सहमती दिली. पण अद्यापही या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्यनिर्मात्यांना देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला असून मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी जेलमध्ये जायला तयार : मनोज जरांगे
आम्ही जे केलं ते प्रमाणिकपणे जनजागृतीसाठी केलं, कारण तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे. हजारो कोटी घोटाळा करणाऱ्यांचं अटक वॉरंट कॅन्सल होतं. मग मी छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केला का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचं आयोजन केलं होतं. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्यनिर्मात्यानं कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयानं नाट्य निर्मात्याची फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचे वॉरंट काढले आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते. त्यावेळी 500 रुपयांचा दंड करुन मनोज जरांगे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आलं होतं.
2013 मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं. त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यानं केला होता.