बुलढाणा : पेरणीचा हंगाम आला तरी पेरणीसाठी जवळ पैसा नाही आणि बँका पीककर्ज देत नाहीत. त्यामुळे बुलढाण्यातील पाच शेतकऱ्यांनी त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढल्याची धक्कादायक बातमी आहे. आपल्याला किडणी विकायची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली आहे. एकतर पीककर्ज द्या नाहीतर आमच्या किडन्या विका अन पेरणीसाठी आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीच्या मागणीने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


दरवर्षी बँकेचे आणि सावकाराचे कर्ज काढून पेरणीची तयारी करणारा शेतकरी राजा याही वर्षी कर्जावर अवलंबून आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे पूर्णतः नुकसान झालं होतं. त्यामुळे आवक मिळालीच नाही, परिणामी मागील वर्षी घेतलेले पीक कर्ज तो फेडू शकला नाही. आता खरीप हंगाम सुरू झालाय. पेरणी करायची म्हणजे पैसा लागणार आणि पैसा हा कर्जाशिवाय कुठून उभा राहणार हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे . त्यामुळे तो कर्ज मिळवण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारतोय. मागील वर्षीच थकलेलं कर्ज पाहता बँक प्रशासन त्याला दारात उभे करत नाही. त्यामुळे कंटाळून वाकोडी गावातील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील या पाच शेतकऱ्यांनी  काळजाला घर पाडणारी मागणी केली आहे. मुख्यमंत्री साहेब एक तर पीक कर्ज द्या नाहीतर आमच्या किडन्या पन्नास हजाराला विकत घ्या जेणेकरून आम्ही शेतात पेरणी करू शकू अशा आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. 


नेते येतात, बरीच आश्वासने देतात आणि निघून जातात. मात्र शेतकरी राजा बॅंकेच्या तर कुठे सावकाराच्या घरी चकरा मारुन थकतो. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर अजून पर्यंत शासनाने पुनर्गठनचे कोणत्याही प्रकारचे आदेश दिले नाहीत, त्यामुळे आम्ही पुनर्गठन करुन संबंधित शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकत नाही असं उत्तर येतं.


या वर्षी चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पण आता पेरणीचा हंगाम आला तरी शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसाच नसल्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. 


पहा व्हिडीओ : पेरणीसाठी पैसा, बँक कर्ज देत नाही, किडनी विकायला परवानगी द्या; बुलढाण्यातील पाच शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र



महत्वाच्या बातम्या :