कोल्हापूर : राज्यातील 21 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा पाच टक्क्यांहून कमी असताना पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. कोल्हापुरचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा 11 टक्के, सांगलीचा 10 टक्के तर साताऱ्याचा 9.75 टक्के इतका आहे. कोल्हापुरचा विचार केला तर गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही 1500 ते 2200 पर्यंत वाढत आहे.


कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यासाठी निर्बंधांचे पालन करण्याऐवजी नागरिकांकडून करण्यात येणारा हलगर्जीपणा हा अधिक जबाबदार असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आता ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. 


सध्या कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या स्तरामध्ये असला तरी निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे हा दर पुन्हा वाढतो की काय अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. शनिवारी आणि रविवारी कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला असून नागरिकांना बाहेर पडू नयेत अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 


शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रसार आता चिंताजनक असून काही ठिकाणी गावंच्या-गावं कोरोनाबाधित झाल्याचं दिसून आलं आहे. या ठिकाणची परिस्थिती पाहून राज्याच्या टास्क फोर्सनेही या ठिकाणी भेट दिली असून काही आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत. 


कोल्हापुरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना स्वत:हून काही निर्बंध पाळावेत अशा प्रकारचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनच्या निर्बंधाचे कडक पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलिसांची नियुक्ती केली आहे.


पहा व्हिडीओ : Corona Update : कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक


 



महत्वाच्या बातम्या :