सोलापुरात 'नो डिजिटल' झोनमध्ये लावलेले अमित शाहांच्या स्वागताचे बॅनर्स महापालिकेने हटवले
मित शाह देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरात येत आहेत. त्यामुळे शहरभर त्यांच्या स्वागताचे बॅनर्स भाजप कार्यकर्त्यंकडून लावण्यात आले आहेत.
सोलापूर : अमित शाह यांचे नो डिजिटल झोनमध्ये लावण्यात आलेले बॅनर सोलापूर महापालिकेच्या वतीने काढण्यात आले आहेत. 1 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरात महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.
अमित शाह देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरात येत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांच्यावतीने ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यातील नो डिजिटल झोनमध्ये विना परवानगी बॅनर लावल्याने महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. सोलापूरातील पार्क चौक, एसटी स्टँड परिसरातील सर्व बॅनर अतिक्रमण विभागच्यावतीने हटवण्यात आले आहे.
बॅनरवर अमित शाह यांचा उल्लेख 'सरदार'
कलम 370 रद्द झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. अमित शाह यांनी कलम 370 प्रकरणी केलेल्या कामगिरीचा कौतुक म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर 'सरदार' असा उल्लेख केला आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी तुलना करत अमित शाह यांचा उल्लेख 'सरदार अमित भाई शाह' असा करण्यात आल्याचं दिसत आहे.
कलम 370 रद्द झाल्यानंतर अमित शाह महराष्ट्रात पहिल्यांदाच सोलापूरतील महाजनादेश यात्रेच्या समारोपच्या बोलणार आहेत. त्यामुळे या सभेत अमित शाह काय बोलणार याकडे ही सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.