Electric Bus : सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने बनवलेल्या इलेक्ट्रिक बसमधून गडकरींची सफर
प्रिसिजन ग्रुपने बनवलेली इलेक्ट्रिक बस सध्या रोडवरील चाचणीसाठी सोलापुरातल्या रोडवर धावत आहे. याच बसचे प्रात्यक्षिक नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले.

सोलापूर : सोलापुरातल्या प्रिसिजन ग्रुपने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सोलापुरातल्या हॉटेल बालाजी सरोवर ते माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंत प्रवास देखील गडकरी यांनी याच बसमधून केला. प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शहा, कार्यकारी संचालक करण शहा हे देखील यावेळी उपस्थित होते. गडकरी यांनी बस बद्दल संपूर्ण माहिती यावेळी जाणून घेतली.
जगभरातील नावाजलेल्या वाहन कंपनीना कॅम्पसॉफ्ट पुरवणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहाने इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यासाठी प्रिसिजन उद्योग समूहाने नेदरलँड येथे ईमॉस ही कंपनी देखील खरेदी केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून परदेशात प्रिसिजन उद्योग समूह इलेक्ट्रिक वाहन बनवण्याचे काम करत आहे. भारतात देखील रेट्रोफिटेड एलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचे काम प्रिसिजनद्वारे करण्यात येणार आहे.
याची चाचणी म्हणून प्रिसिजनने काही महिन्यांपूर्वी एका मध्यम आकाराचे बसची निर्मिती केली होती. या बसने आतापर्यंत विविध कागदोपत्री चाचण्या पूर्ण केल्या असून सध्या रोडवरील चाचणीसाठी सोलापुरातल्या रोडवर ही बस धावत आहे. याच बसचे प्रात्यक्षिक नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आले. नवीन इलेक्ट्रिक वाहनाचा खर्च हा अत्यंत जास्त असतो. मात्र रेट्रोफिटेड गाडीमध्ये हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. लोकांकडे आधीपासून असलेल्या ज्या इंधनावरील गाड्या आहेत त्यांचे इंजिन काढून त्याचेच रुपांतर इलेक्ट्रिकमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे लोकांची आर्थिक बचत होईल तसेच पर्यावरणाचा देखील फायदा होईल.
"नितीन गडकरी यांना ही बस दाखवण्याचं आमचं अनेक दिवसांपासूनचे स्वप्न होते. आज ती संधी प्राप्त झाली. त्यांनी या बसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेत अनेक सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. बस भारतीय बनावटीची आहे का या बद्दल त्यांनी माहिती घेतली. या बसमध्ये 65 टक्क्यांहून अधिक पार्टस हे भारतीय बनावटीचे असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हे ऐकून त्यांना फार आनंद झाला. पुढे प्रेझेंटेशन देण्यासाठी त्यांनी दिल्लीला येण्याचे देखील सांगितलं आहे," अशी प्रतिक्रिया प्रिसिजन ग्रुपचे प्रमुख यतीन शहा यांनी दिली.
























