पालघर: देशाबरोबर राज्यावर घोंगावत असलेल्या कोरोना महासंकटाबरोबरच निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यात लोकांच्या उरात धडकी भरवली होती. मात्र आता निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता पालघर जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी दुपारनंतर निसर्ग चक्रीवादळाचा फटका पालघरला बसणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, आरोग्य विभाग, विद्युत वितरण, पोलीस प्रशासनाच्या पाच टीम जिल्ह्यातील विविध भागात कार्यरत करण्यात आल्या होत्या.

अलिबागमध्ये सकाळी मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहून समुद्रात एक जहाज अडकल्याच्या घटनेनंतर साधारणपणे दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या वेळेत हे चक्रीवादळ जिल्ह्यात धडकण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासन समुद्राकडे डोळे लावून बसले होते. अलिबागमध्ये सकाळी धडकल्यानंतर हे चक्रीवादळ जसजसे पुढे सरकत होते तसतसे पालघरवासीयांसोबत जिल्हाप्रशासनाची चिंता वाढत होती. परंतु हे वादळ अलिबागवरून पेण, नाशिक भागातून पुढे सरकू लागल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतु जिल्ह्यात झाड पडण्याच्या तुरळक घटना घडल्या.



सकाळपासूनच उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, तहसीलदार सुनील शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सपोनि जितेंद्र ठाकूर यांनी सातपाटीसह उच्छेळी-दांडी,मुरबे,नवापूर,केळवे आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर होणारा संभाव्य धोका पाहता प्रशासनाने गावा गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. किनारपट्टीवरील 22 गावातील सुमारे 16 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तोरस्कर यांनी  सांगितले. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वणगा यांनीही सातपाटी सह अन्य गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.





किनारपट्टीवरील वसई ते झाई ह्या 110 किलोमीटर अंतरावरील गावांची एनडीआरएफ पथकाने पाहणी करत स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धोकादायक भाग असलेल्या डहाणू, चिंचणी, नरपड, बोर्डी,सातपाटी, केळवे,मुरबे,दांडी,आदी गावातील किनाऱ्यावर आपला तळ ठोकला होता. वसई तालुक्यातील पाचूबंदर येथील समुद्रात मासेमारीला गेलेल्या दयावान आणि प्रेमळ ह्या दोन मच्छीमार बोटी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अडकून पडल्या होत्या. साधारणपणे 20 नॉटिकल समुद्री क्षेत्रात या दोन्ही बोटीतील 30 मच्छीमार अडकून पडल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

जिल्हाधिकारी डॉ.शिंदे ह्यांनी तात्काळ कोस्टगार्डशी संपर्क साधून त्यांना बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. सातपाटीमधील मच्छीमार सनी चौधरी यांनी त्या बोटींच्या वायरलेस सेटवर संपर्क साधून त्यांना सातपाटी बंदरात येण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारीनाईक यांनी एनडीआरएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदतकार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले. समुद्रातील वाऱ्याचा वेग कमी झाल्याने या दोन्ही बोटी वसईमध्ये उशिराने पोहोचल्या. 1 जूनपासून समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असताना पावसाळी बंदीचे आदेश डावलून या बोटी समुद्रात मासेमारीसाठी राहिल्याने सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पालघरकडून त्यांच्यावर कारवाईची शक्यता होण्याची शक्यता आहे.


या वादळाने जरी पालघर जिल्ह्याचा पश्चिम भाग वाचला असला तरीही हे वादळ जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या ग्रामीण भागाला धोका निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजूनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.