मुंबई : राज्यात आज 'निसर्गा'चाच दिवस असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, कोकण किनारपट्टीवर आज निसर्ग नावाच्या चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला. तर, राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. पावसासोबत सोसाट्याचा वाराही सुरु असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या संपत्तीचे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत.


निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. तिकडे राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसाने हिंगोलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली आहे. हिंगोली शहरासह तालुक्यात दुपारी दोन वाजताच्या सुमारास तब्बल एक तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शहरातील अनेक नाले तुडुंब भरून वाहत होते. तर गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेले नागरिक काही प्रमाणात सुखावल्या चे चित्र होतं.
शेतीकामांना वेग
जिल्ह्यातील वसमत, औंढा व सेनगावमध्ये देखील गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकरी राजा खरिप पेरणीच्या तयारीत लागला आहे. काही शेतकरी अल्पशा आणि बेमोसमी पाण्यावर, हळद व कपाशीची लागवड करू लागले आहेत. त्यामुळे काही घाई न करता मान्सूनची हजेरी लावल्यानंतरच शेतकर्‍यांनी पेरणी करावी असे आवाहन हिंगोली जिल्हा कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना केले आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. असे देखील आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


पुण्यामध्ये रात्री बारा वाजल्यापासून ते आतापर्यंत झाडे पडण्याच्या संदर्भातले जवळपास 40 फोन आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. सुरुवातीला हडपसर, कोरेगाव पार्क या भागातून फोनजास्त आले. पण आता तशी परिस्थिती नसून संपूर्ण शहरातूनच झाडे पडण्याच्या संदर्भात आतापर्यंत 40 फोन आल्याची अग्निशमन दलाने माहीती दिली आहे. पुण्यात काल रात्रीही मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या.


निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव


निसर्ग चक्रीवादळ अद्याप नाशिक जिल्ह्यात पोहचले नाही. दुपारी दोन वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील अंदरसुल गावाच्या परिसरात जोरदार वादळ आल्याने पोल्ट्री व्यवसायिक गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री शेडचे संपुर्ण पत्रे उडून मोठं नुकसान झालंय. तर काही काळ मध्य स्वरुपाच्या पावसाने यावेळी हजेरी लावली. जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची रिपरिप अधून मधून सुरु आहे. मात्र, कोठेही जोरदार स्वरुपाचा पाऊस झालेला नाही. वरती धुळे जिल्ह्यात लामकानी परिसरात मध्यम-मुसळधार पाऊस बरसला आहे. येथे कधी मध्यम तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी आहे, सुरुवातीला वेगाचे वारे होते. मात्र, वाऱ्याचा वेग देखील कमी झालाय. धुळे जिल्ह्यातील म्हसदी, चौगाव परिसरात देखील मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.


चंद्रपूर जिल्ह्याला बदललेल्या वातावरणाचा ही फटका बसलाय. पुन्हा एकदा चंद्रपुरात जोरदार पावसाने नागरिकांची त्रेधा उडवली आहे. मध्यरात्री थोडा वेळ बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सकाळी पुन्हा काळी ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वदूर पाऊस झाल्याने आता शेतिच्या कामाला वेग येणार आहे. मागील तीन दिवसांपासून यवतमाळमध्ये पाऊस सुरु आहे. परिणामी सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाली आहे. अकोला, नादपूर, सांगली, सोलापूर, पंढूरपूर या ठिकाणीही पावसाची रिपरिप सुरू आहे.