मुंबई : मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोका कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे दोन तास जोरदार वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील अशी माहिती आहे. असं असलं तरी या वादळामुळं मुंबई-पुण्यासह, अलिबाग, पालघर, रत्नागिरीमध्ये मोठे नुकसान झाल्याचं देखील समोर आलं आहे.


पुणे जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. वादळामुळं हवेली तालुक्यात एकाचा तर खेड तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुण्यातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, शिरूर, दौंड या ठिकाणी अजूनही मध्यम स्वरूपाचा वारा व पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी शाळांचे पत्रे, घराचे छप्पर, झाड कोसळणे, विजेचे खांब पडणे आदी प्रकारचे नुकसान दिसून आले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून जनजीवन सुरळीत करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली

चक्रीवादळामुळं परिस्थितीमुळे पुणे शहराच्या विविध भागात काल रात्रीपासून आज सायंकाळी पाच पर्यंत झाड पडण्याच्या 60 च्या आसपास घटना तर 9 ठिकाणी पाणी साठल्याच्या अग्निशमन दलाकडे नोंदी आल्या आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. पुण्यामध्ये रात्री बारा वाजल्यापासून ते आतापर्यंत झाडे पडण्याच्या संदर्भातले जवळपास 40 फोन काॅल आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली आहे.

चक्री वादळाचा फटका पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला

अलिबाग-उरण मार्गे भूगर्भावर प्रवेश केलेल्या चक्रीवादळाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला ही लक्ष केलं. पुण्याला जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी झाडं कोसळल्याचं चित्र दिसून आलं. ती झाडं रस्त्यावरून हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. अनेक ठिकाणी मार्गावर कोसळलेले वृक्ष कर्मचाऱ्यांनी हटवले आहेत.

विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर आलं. तर मुंबईतील काळाचौकी परिसरात झाड उन्मळून पडलं, यात चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील कानगार नगर वसाहतीत एक विशाल पिंपळाचं झाड बुधवारी दुपारी उन्मळून पडलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईला निसर्ग या चक्रीवादळानं थेट तडाखा दिला नसला जीवितहानी झाली नसली तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिकठिकाणी उन्मळून पडलेल्या वृक्षांमुळे मुंबईला त्याची झळ मात्र नक्कीच बसली. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसाठी पुढील दोन दिवस धोक्याचे असतील असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. दोन दिवस लोकांनी बाहेर पडू नये, त्यातल्या त्यात समुद्रकिनारी तर आजिबात येऊ नये, असं महापौरांनी म्हटलं आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे स्थलांतरितांच्या व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
निसर्ग चक्रीवादळामुळे जिवितहानी होऊ नये म्हणून मुंबई शहर जिल्हयातील समुद्रालगत राहणाऱ्या सात हजार दोनशे व्यक्तींचे सुरक्षीतस्थळी स्थलांतर केले, त्यापैकी कुलाबा येथील 3000 नागरीक होते. या चक्रीवादळामुळं मुंबई शहर जिल्ह्यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. दक्षता म्हणून प्रशासनाने किनाऱ्या लगतच्या नागरिकांचे स्थलांतर केले होते. त्या बरोबरच दहा पथके चक्री वादळामुळे होणार्या नुकसानामध्ये मदत करण्यासाठी तयार होती. समुद्रालगत राहणाऱ्या वरळी, माहीम, दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. यात ई- विभाग,कोवळा बंदर, मिरा दातार दर्गा, भांडारवडा येथील 1200, जी/उत्तर विभाग ,पंजाबी कॉलनी , सायन कोळीवाडा बंगाली पुरा झोपडपट्टी,सायन,माहीम 1200, एफ/उत्तर विभाग वडाळा, 350, जी/दक्षिण वरळी 250, ए विभाग, गिता नगर,गणेशमूर्ती नगर 3000, डी विभाग, दर्या नगर, शिवाजी नगर, सागर नगर, रामकुंड नगर 1200, अशा 7200 लोकांना ठिकठिकाणी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील आगरवाडी येथे देखील घरावर झाड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसाळ्यात घराचं झालेल्या नुकसानीमुळे आता नागरिकांना घर दुरूस्तीसाठी मोठ्या कसरतीचा सामना करावा लागणार आहे. रत्नागिरीतील नाणीज जवळील नवीन मठाजवळ निसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपाने अजस्त्र वृक्ष आज सकाळी उन्मळून पडला. स्थानिकांच्या मदतीने उन्मळून पडलेला वृक्ष रस्त्यावरून बाजूला काढला गेला. त्यामुळे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्थानिकांच्या मदतीने पडलेल्या वृक्ष बाजूला करण्यात आला. वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली.

रत्नागिरीपासून 50 ते 60 किमी लांब असलेल्या देवरूखमध्ये देखील चक्रीवादळाचा परिणाम दिसून आला. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले.सकाळी सहा वाजल्यापासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे देवरूखमघधील इतरही काही भागात घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे.  राजापूर तालुक्यातील सागवे, जैतापूर, कशेळी, अणसुरे, धाऊलवल्ली, नाटे, आंबोळगड या भागात देखील काही प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. या परिसरातील गावांमध्ये काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले. तर काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळून किरकोळ नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या साऱ्या परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा जैतापूर बाजापपेठेला देखील बसला. जैतापूर बाजारपेठेत देखील खाडीचं पाणी शिरलं. यामुळे व्यापाऱ्यांना किरकोळ नुकसानीला सामोरं जावे लागले. प्रशासनाकडून किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे देखील निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. जैतापूर कांबळी वाडीतील दिपक पेडणेकर यांच्या घरावर देखील माडाचं झाड कोसळून नुकसान झाले. यावेळी स्थानिक प्रशासनासह आमदार राजन साळवी यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. तर प्रशासनानं देखील पंचनामा केला. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात देखील काही गावांमध्ये घरांवर झाडे पडली आहेत. शहरातील शवरवाडी येथे गोठ्यावर झाड पडल्याने नुकसान झाले. तर पुनस येथील चंद्रकांत गुरव, वेरळ येथील सुरेश पांचाळ या नागरिकांच्या घरावर देखील झाडं पडून त्यांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वरमधील आरवली येथील हॉटेल विक्रांतवर देखील झाड कोसळल्यानं हॉटेलचं लाखो रूपयाचं नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर अनेक वर्षाचं असलेले हे झाड थेट हॉटेलवर कोसळले. दरम्यान पावसाळा तोंडावर आल्यानं आता दुरूस्तीकरता मालकाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
चक्रीवादळाचा मोठा फटका हापूस आंब्याला 

राज्यात आलेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका हापूस आंब्याला बसला आहे. कोकणातील हापूस आंबा एपीएमसी मार्केटला येण्याचे बंद झाले असून येत्या 10 जूनपासून जुन्नरचा हापूस आंबा एपीएमसी मार्केटला सुरू होणार होता. मात्र आता निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जुन्नर येथील हापूस आंबा फळाला बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि जोरदार पावसामुळे झाडावरील संपूर्ण हापूस आंबा जमीनदोस्त झाला आहे. आंब्यांचा जमिनीवर सडा पडला असल्याने वर्षभर जीवाचे रान करुन पिकवलेला हापूस डोळ्या देखत जमिनीवर पडून खराब झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. जुन्नरच्या हापूस आंब्याचे नुकसान झाल्याने वाशीच्या एपीएमसीमध्ये होणारी आवक आता थांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत चालणारा हापूस आंब्याचा मोसम आता लवकरच संपुष्टात येणार असल्याचे एपीएमसी मधील व्यापारी सांगत आहेत.


वसई : निसर्ग चक्रीवादळ हे पालघर आणि वसईला धडकलं नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र तिथं दिसून आला. वसई विरारमध्ये काही ठिकाणी झाड उन्मळून पडली आहेत. नुकसानीच्या घटना समोर येथे आहे. मात्र यात जीवितहानी नाही. वसईच्या समता नगर येथे रस्त्यालगतच झाड कोसळलं. तर विरार पूर्वच्या मनवेलपाडा येथे एका चाळीवर कडूलिंबाचं झाड पडल्यानं नुकसान झालं. तसेच विरार पश्चिमेच्या नंदाख़ाल बोरखड येथे जांभळाचं झाड घरावर पडल्यानं घराचं नुकसान झालं. तरी सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही.

भिवंडीत वादळी वाऱ्याने यंत्रमाग कारखान्याचे पत्रे उडाले

भिवंडी शहरात रात्रीपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरातील हंडी कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखान्याचे पत्रे उडून गेले. तसेच भिंत देखील कोसळली. त्यामुळे कारखान्यात काम करत असलेले दोन ते तीन कामगार जखमी झाले. याशिवाय भिवंडी शहरात तसेच ग्रामीण भागात चार ते पाच ठिकाणी झाड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या चक्रिवादळाचा वेग मोठ्याप्रमाणात नसला तरी एवढं नुकसान मात्र नक्की झालंय. वीज वितरण कंपनीने अनेक भागातील वीजपुरवठा खंडित केला होता.

मुरुड व श्रीवर्धनला चक्रीवादळाचा मोठा फटका

रायगडमधील मुरुड, श्रीवर्धन भागातील किनारपट्टी आणि आतल्या भागात वेगाने वारे वाहत आहे. आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र दिवसभर वारा आणि पावसामुळं झाडं मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडली आहेत. शिवाय विद्युत जोडणीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे.

मुरुड व श्रीवर्धन भागात मोबाईल यंत्रणा विस्कळीत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. रोहामधील औद्योगिक वसाहतीच्या सर्व कंपन्या सुरक्षित असून सोलवे कंपनीची भिंत पडली आहे. प्रशासनाकडून मदतकार्य तातडीने सुरू केले आहे. जनजीवन आज उशिरापर्यंत सुरळीत होऊन जाईल, असं जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

पालघर : सध्या समुद्र शांत मात्र भीती कायम

अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ सध्या उत्तर महाराष्ट्राकडे कूच करू लागल्याने पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सध्या समुद्र शांत असून पाऊस ही थांबला आहे. त्यामुळे समुद्रावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. वादळाचा धोका अजूनही टळला नसून आपल्याला 5 ते 6 तास वाट पाहावी लागणार असून जिल्ह्याचा पश्चिम भाग सुरक्षित होत असला तरीही जिल्ह्यातील पूर्वेकडील वाडा, जव्हार ,मोखाडा या तालुक्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं पालघर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे अजूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे.