रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. मात्र जिवितहानी नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानाबाबत 2 दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.


रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढऱ्या समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील 13 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील, असंही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


मुंबई किनारपट्टीवरील नागरिकांचे स्थलांतर


मुंबईच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ आदळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे. गीतानगरमधील 11 हजार लोकांना स्थलांतरित करण्याचं काम यावेळेस करण्यात आलं आहे.


ठाणे जिल्ह्यात हाय अलर्ट


निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याला देखील हायअलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पोहोचलेले आहेत. या चक्रीवादळाचा तडाखा ठाणे जिल्ह्याला बसल्यास कोणतीही आपत्ती उद्भवल्यास हे जवान तात्काळ नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी सज्ज झालेले आहेत. या दलामध्ये 30 जवान आणि 3 अधिकारी यांचा सहभाग आहे.