नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात नव्या वाघाचे आगमन
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड - तळोदी वनपरिक्षेत्रातून जेरबंद करून एनटी 1 नावाच्या वाघाला नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले गेले होते.
नागपूर : नागपूरच्या महाराजबाग प्राणी संग्रहालयात वाघाच्या रूपाने नवा पाहुणा आला आहे. "एनटी 1" नावाच्या या वाघाच्या रूपाने प्राणी संग्रहालयात आधीपासून असलेल्या "जान" नावाच्या वाघिणीला नवा जोडीदार मिळाला आहे. त्यामुळे वाघ वाघिणीच्या या जोडीमुळे महाराजबागेत नवं चैतन्य पसरून पर्यटकांची पावले पुन्हा एकदा महाराजबागेकडे वळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर शहराच्या केंद्रात वसलेले महाराजबाग प्राणी संग्रहालय अनेक दशके जुने असून इथे मोठ्या संख्येने प्राणी आहेत. मात्र, 2016 पासून इथे "जंगलाचा राजा" म्हणजे वाघचं नव्हता. त्यामुळे महाराजबागेकडे पर्यटकांनी ही पाठ वळविली होती. 2016 पर्यंत महाराजबाग प्राणी संग्रहालयात एका वाघासह दोन वाघिणीही होत्या. मात्र, 2016 मध्ये साहेबराव नावाच्या वाघाला पुनर्वसनासाठी प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पाठवण्यात आले. तर 2017 मध्ये 'ली' नावाची वाघीण ही प्राणी संग्रहालयातून इतरत्र पाठवण्यात आली. त्यामुळे गेली तीन वर्षे जान ही वाघीण एकटी पडली होती. नुकतंच महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे मास्टर प्लॅन मंजूर करताना केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने वाघिणीला जोडीसार आणण्याची अट घातली होती. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड - तळोदी वनपरिक्षेत्रातून जेरबंद करून एनटी 1 नावाच्या वाघाला नागपुरातील गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले गेले होते. आता वन विभागाच्या मान्यतेने त्याच एनटी 1 वाघाला महाराजबाग प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे.
काल दुपारी गोरेवाडा मधील वन्यजीव बचाव केंद्रातून एनटी 1 वाघाला एका मोठ्या पिंजऱ्यात महाराजबाग प्राणी संग्रहालयात आणले गेले. जान या वाघिणीच्या स्वरूपात नव्या जोडीदाराची भेट होणार आहे. कदाचित याच पूर्व अंदाजाने एनटी 1 लगेच पिंजऱ्यात आला आणि महाराजबागेत आणल्यानंतर ही तो त्याच्या पिंजऱ्यातून मोठ्या पिंजऱ्यात लगेच गेला. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना फारशी वाट बघावी लागली नाही. सध्या एनटी 1 या वाघाला प्राणी संग्रहालयातील वातावरणाशी जुडवून घेण्यासाठी पुरेशा वेळ दिला जाणार असून त्याला लगेच पर्यटकांसमोर आणले जाणार नाही आहे. दरम्यान प्राणी संग्रहालयात आणल्या गेल्यानंतर एनटी 1 काही प्रमाणात आक्रमक झाला असून सतत त्याची डरकाळी ऐकू येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.