Jayant Patil : कांदा प्रश्नावर सरकारकडून थातुरमातूर उत्तर; जयंत पाटील यांचा हल्लाबोल
Ahmednagar News Update : राज्यातील कांदा दराच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Ahmednagar News Update : कांद्याचे दर (onion Price) पडल्याने राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती. फडणवीसांनी गुरुवारी (2 मार्च) याबाबतची माहिती दिली होती. प्रत्यक्षात मात्र, बाजार समित्यांना याबाबत काहीही कळवलेलं नाही. अद्याप बाजार समितीत्यांमध्ये नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली नसल्याने समिती आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. कांदा प्रश्नावर सरकारकडून थातुरमातूर उत्तर दिलं जात असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील अहमदनगर येथे सावता परिषदेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. "कांदा (Onion) उत्पादकांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, याबाबत विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे. मात्र, सरकारने या संदर्भात थातुरमातूर उत्तर दिलेले आहे. विशेष म्हणजे एक समिती नेमली जाईल अशी त्यांनी घोषणा केली. मात्र, ही समिती स्थापन होईपर्यंत शेतकरी कांदा विकून मोकळे होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडणार नाही अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
निर्यात धोरणाबाबत जयंत पाटील म्हणाले, "निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये सरकारने त्यांची भूमिका जाहीर केली आहे. निर्यात बंदी नाही असं सरकारचं म्हणणं आहे." दरम्यान, जयंत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांवरूनही भाजपवर टीका केली."स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला भाजप तयार नाही, ते घाबरलेले आहेत. कारण त्यांनी महाराष्ट्रात शिंदे गटाबरोबर जी युती केलेली आहे ती महाराष्ट्रातील जनतेला पटलेली नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
"लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून तर एकत्र लढलो तर निश्चितपणे आम्ही जास्त जागांवर विजयी होऊ. आकड्यांमध्ये किती जागा येतील हे आता सांगता येणार नाही. परंतु, नक्कीच आमचा जास्त जागांवर विजय होईल, असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
"ओबीसी समाजाची नव्याने जनगणना व्हावी"
"ओबीसी समाजाची नव्याने जनगणना व्हावी अशी मागणी आहे. समता परिषदेने देखील जात निहाय जनगणना करावी अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असल्याचेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Agriculture News : फडणवीसांचं आश्वासन, तरीही नाफेडकडून बाजार समितीत कांदा खरेदी नाही; बळीराजा मेटाकुटीला