Kiran Mane : राजकीय पोस्ट केल्यामुळे ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकल्यानंतर अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रचंड चर्चेत आले आहेत. राजकीय पोस्ट केल्यामुळे आपल्याला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर अनेकांनी त्यांची बाजू घेत त्यांचं सर्थन केलं आहे तर काहिंनी त्यांचा विरोधही केला आहे. परंतु, आता हा सर्व वाद मिटवण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्ती केली आहे. 


कलाकार, प्रोडक्शन हाऊस आणि स्टार प्रवाहमधील वाद मिटवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी मध्यस्ती केली आहे. चांगली मालिका बंद होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  सांगितले.  


किरण माने प्रकरणात सतीश राजवाडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपण मानेंना नोटीस दिली होती का? मेल पाठवला होता का? असे प्रश्न सतीश राजवाडे यांना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विचारण्यात आले. एका कलाकाराला बाहेर काढणं योग्य नाही. मानेंच्या बाजूनं महिला कलाकारांची संख्या जास्त आहे. सत्याची बाजू घेणाऱ्या या खऱ्या जिजाऊंच्या लेकी आहेत. किरण मानेंवर अन्याय झाल्याचं स्पष्ट होत आहे असं मत मंत्री आव्हाड यांनी व्यक्त  केले आहे.  


जितेंद्र आव्हाड म्हणाले, सतीश राजवाडे यांनी प्रोडक्शन हाऊस यांना घेऊन येतो असं सांगितलं आहे. या प्रकरणाला कुठेही रंग न लावता आणि कोणावरही अन्याय न होऊ देता काम केलं पाहिजे. राजवाडेंना या प्रकरणात काहीच माहित नव्हतं असं त्यांनी सांगितलं आहे."  अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी  दिली आहे. 


महत्वाच्या  बातम्या