Dolly Bindra Birthday: ‘बिग बॉस’ (Big Boss) आणि वाद ही समीकरण तसं नवं नाही. मात्र, जेव्हा बिग बॉसमधील वादांचा विषय निघतो, तेव्हा डॉली बिंद्रा (Dolly Bindra) हे नाव पहिलं तोंडावर येतं. 20 जानेवारी 1970 रोजी मुंबईत जन्मलेल्या डॉली बिंद्राने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. आज (20 जानेवारी) डॉलीचा वाढदिवस आहे.


डॉली बिंद्राने चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये भरपूर काम केले आहे. ‘बिग बॉस’ सीझन 4 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या डॉली बिंद्राने घरात चांगलाच गोंधळ घातला होता. डॉली तिच्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटांपेक्षा अधिक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. सध्या ती कोणत्याही नव्या टीव्ही शोमध्ये दिसत नाही, पण कधी शेजाऱ्याला शिवीगाळ करून, तर कधी जिम कर्मचाऱ्याला धमकावल्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.


‘बिग बॉस 4’च्या घरातलं वादळ 


डॉलीने वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. यानंतर तिने 'हम सब एक हैं', 'गदर', 'क्रेझी 4' सारख्या चित्रपटात काम केले. डॉली बिग बॉसच्या चौथ्या सीझनमधील वादांसाठीही ओळखली जाते. सीझन 4 मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या डॉलीने श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी या स्पर्धकांशी जोरदार भांडण केले होते.


अंड्यावरून मनोज तिवारीशी वाद!


‘बिग बॉस’च्या घरात तिचे मनोज तिवारीसोबतचे भांडण खूपच गाजले होते. अंड्यावरून सुरू झालेला हा वाद इतका वाढला की, डॉलीने मनोजला चक्क चावण्याची धमकीही दिली होती. या वादादरम्यान डॉली म्हणाली होती की, बिग बॉसने जेवण बनवू नये असा आदेश दिला आहे, परंतु मनोज तिवारीने सांगितले की, त्याला अंडी खायची आहेत. दोघांचा हा वाद इतका टोकाला गेला की, प्रकरण शिवीगाळ ते हाणामारीपर्यंत पोहोचले.


बॉलिवूडमध्ये नेहमीच ‘साईड  कॅरेक्टर’


बॉलिवूडमध्ये डॉली नेहमीच दुय्यम किंवा सहकलाकाराचे पात्र साकारताना दिसली. ‘तारा रम पम’, ‘मुमताजी’, ‘तलाश’, ‘स्टाईल’, ‘मैंने प्यार क्यु किया’ आणि ‘क्रेझी 4’ या चित्रपटात तिने काम केले आहे. याशिवाय डॉली राधे माँ आणि टल्ली बाबावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे  देखील चर्चेत होती.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha