एक्स्प्लोर
Advertisement
बारामतीत पवारांना धक्का, माळेगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा
सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली.
बारामती : बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली.
भाजपचे जयदीप विलास तावरे यांना नऊ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना आठ मतं मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेली महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ आज थांबली.
गेली दोन महिने सरपंच निवडीचं नाट्य रंगलं होतं. मावळते सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना ठरवून दिलेला कार्यकाळ संपून गेला होता. मात्र त्यांनी राजीनामा न दिल्याने राष्ट्रवादीचेच काही सदस्य नाराज झाले होते. अखेर अजित पवारांनी शिष्टाई करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना थोडाच काळ यश आलं.
सरपंचपदाच्या निवडणुकीत 17 सदस्यांपैकी 10 सदस्यांनी भाजपला मतदान केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं याच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निवासस्थान आहे. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
गेली 10 दिवस या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची चांगलीच चर्चा रंगली होती. माळेगाव बुद्रूक तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 28 हजार इतकी असून मोठ्या शैक्षणिक संस्था आणि साखर कारखाना या ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतात.
या निवडीने पवारांना जबर धक्का बसला आहे. माळेगाववर शरद पवारांचे प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी भाजपने राष्ट्रवादीला धक्का देत माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्याकडे खेचला होता. कारखान्या पाठोपाठ ग्रामपंचायतीवरही भाजपने झेंडा फडकवल्याने पवारांना चांगलाच धक्का बसला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement