Mahayuti Seat Sharing : भाजपाच्या केंद्रीय (BJP) निवडणूक समितीची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील महायुतीच्या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यात आली. आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडत आहे.
अजित पवार यांनी काल अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अजित पवार बैठक घेत आहे. बैठकीला प्रफुल्ल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित आहेत.
छगन भुजबळ नाशिकच्या जागेसाठी आग्रही
नाशिक जिल्हा हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेची आग्रही मागणी केली आहे. नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच मिळावी यासाठी छगन भुजबळ आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. यामुळे महायुतीच्या इच्छुकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
मनसेच्या एन्ट्रीने नाशिकचा पेच वाढला
अलीकडेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मनसेकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आल्याने नाशिकच्या महायुतीच्या इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता ही जागा मनसे, राष्ट्रवादी अजित पवार गट की शिवसेना शिंदे गटाला मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
साताऱ्याच्या तिढा सुटणार?
तर, दुसरीकडे सातारा लोकसभेवर राष्ट्रवादीकडून दावा केला गेला आहे. उदयनराजे भोसले भाजपकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपची कोंडी झाल्याचे चित्र आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव अजित पवारांकडून देण्यात त्यांना देण्यात आला असून उदयनराजे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास ठाम आहेत. आजच्या बैठकीत साताऱ्याच्या जागेचा तिढा सुटणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या