जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi ) महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या बैठकीला सुरवात झाली आहे. बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून, सर्वत्र भगवं वादळ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे भाषणाला उठताच पाटील पाटील पाटील अशा घोषणांनी परिसर दणाणले. 


यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी बैठक आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. सहा महिन्यापूर्वीचे गुन्हे आता दाखल करत आहेत. त्यावेळी तुम्ही झोपले होते का?, एवढी नाराजी समाजाची घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती. हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात असे जरांगे म्हणाले. 


आता मराठे थांबणार नाही... 


यवतमाळचे पोलीस महिलांना बसून ठेवत आहे. आंतरवाली सराटीला जाऊ नयेत म्हणून अडवले जात आहे. मात्र, मराठे नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. मी भावनेच्या आहारी बोलत नाही, राजकारण माझा मार्ग नाही. मी गोरगरीब मराठ्यांना मोठं करत असतो. मराठा समाजावर तुम्ही असा अन्याय करणार असाल, स्वतःच्या आई-बहिणी एवढी तुम्हाला इतरांच्या आई-बहिणीबाबत मया आली पाहिजे होती, असे म्हणत जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला. 


शेवटी मराठ्यांचा नाईलाज झाला आहे...


आपल्या लेकरांपेक्षा मोठं कुणीच नाही. ज्यांना आपण मोठ केलं तेच आपल्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देण्यासाठी निघाले आहेत. किती संधी दिली पाहिजे, सर्व संध्या सरकारला दिल्या आहेत. शेवटी मराठ्यांचा नाईलाज झाला आहे. आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला. सरकारने त्याचा डाव साधला. अटी शर्ती आम्हाला घालायच्या आणि त्यांनी अटी शर्तीच्या बाहेर जाऊन काम करायचं. शेवटी निर्णायक भूमिका घेण्याची जबाबदारी समाजाची असते. आपल्याला आपली लढाई लढायाची आणि जिंकायची सुद्धा आहे. आपण ती जिंकली सुद्धा आहे. समाजाची मन खाली होईल असे एकही पाऊल मी उचलला नाही आणि पुढेही उचलणार नाही. आयुष्यभर जेलमध्ये राहण्याची वेळ आल्यास त्याची देखील तयारी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मनोज जरांगेंनी रामबाण अस्त्र बाहेर काढलेच, लोकसभेला मराठा व्होट बँकची ताकद दाखवणार; आंतरवालीत सांगितला प्लॅन