मुंबई: महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जरी झाला नसला तरी राज्याच्या राजकारणाला चांगलाच वेग आल्याचं दिसून येतंय. रोज नवनवीन घडामोडी घडत असल्याचं दिसून येतंय. त्यातच आता बारामतीनंतर रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रावेरसाठी रोहिणी खडसेंना (Rohini Khadse) उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. रावेरमधून भाजपने या आधीच रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 


रोहिणी खडसे या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असल्याने आपण साहेबांना भेटायला आल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं. पण रावेर लोकसभा मतदारसंघातून प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांचे नाव मागे पडल्यानंतर आता रोहिणी खडसे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. 


विधानसभेची तयारी सुरू


रावेर लोकसभा संदर्भात काही पदाधिकाऱ्यांना पवार साहेबांशी भेट घ्यायची होती.उमेदवार कोण असेल हे पक्ष आणि नेते मंडळी ठरवतात. मी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेसाठी तयारी करतेय. त्याबाबत जयंत पाटील अंतिम निर्णय घेतील. अडीच वर्षांपूर्वीच माझ्या नावाची विधानसभेसाठी घोषणा झाली आहे. 


रावेरमध्ये भाजपने एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावर कोण जिंकून येणार असा प्रश्न रोहिणी खडसे यांना विचारला. त्या म्हणाल्या की, मतदार ठरवतील की कोण रावेरमधून जिंकेल. राज्यात महायुतीमध्ये तारांबळ उडते आहे. इथल्या नेतृत्वाकडे अधिकार ठेवले नाहीत, त्यांना दिल्लीत जावं लागतंय. 


पवार साहेबांनी अनेक वर्षे बारामती मध्ये काम केलं आहे, सुप्रिया सुळे आज तळागाळात जाऊन लोकांपर्यंत जात आहेत आणि त्याच प्रचंड मतांनी जिंकून येतील असा विश्वास आहे असं रोहिणी खडसे म्हणाल्या. 


भाजप तोडा आणि फोडा राजकारण करत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. भाजपने पहिला शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडली. पण मतदार राजा हुशार आहे. सध्या सुरू असलेले राजकारण लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्या म्हणाल्या. 


रावेरमध्ये विकास झाला आहे का हे तुम्हाला तिथली जनता सांगेल. आम्ही पक्षाच्या बाजूने आहोत आणि कामाला लागलो आहोत. जिल्हा परिषदनिहाय मेळावे झाले आहेत असंही रोहिणी खडसे म्हणाल्या. 


ही बातमी वाचा: