मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा झाली आहे. अपेक्षेप्रमाणे साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आता चारही प्रमुख पक्षांनी केलेल्या घोषणेनुसार विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी दहा उमेदवार सध्यातरी मैदानात आहेत. नावं घोषित झाली असली तरी अजून भाजप वगळता अन्य पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळं कुण्या एका उमेदवाराने माघार घेतल्यानंतरच निवडणूक बिनविरोध होईल. उद्या महाविकास आघाडीकडून किती जण अर्ज भरणार यानंतर चित्र स्पष्ट होईल. जर महाविकास आघाडीतील कुणी माघार घेतली नाही तर मात्र 21 तारखेला निवडणूक होईल हे निश्चित आहे.
राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींना संधी
अपेक्षेप्रमाणे साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला होता. दीर्घ अनुभव असल्याने त्यांना संधी दिली गेली असल्याचे बोलले जात आहे. तर अमोल मिटकरी यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
शशिकांत शिंदेंचा दीर्घ अनुभव
शशिकांत शिंदे 1999 साली जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. 2001 मध्ये मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. तर 2004 साली जावळी मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर गेले. 2006 साली महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लेबर सेलचे अध्यक्ष झाले. 2009 मध्ये त्यांनी जावळी मतदारसंघ बदलून कोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी घेतली आणि अपक्ष उमेदवार शालिनीताई पाटील यांचा पराभव केला. 2009 साली ते विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद झाले. 2012 साली महाराष्ट्र राज्य प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड झाली. 2013 साली महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला तसेच सातारा जिल्हा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली. 2014 साली कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या 47 हजार मताधिक्यांनी विजयी झाले. 2014 ला देखील त्यांनी मुख्य प्रतोद विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून काम पाहिलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या महेश शिंदे या नवख्या उमेदवाराकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.
अमोल मिटकरी यांचा परिचय
38 वर्षीय अमोल मिटकरी यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासा गावचा. मिटकरी यांना कोणताच राजकीय वारसा नाही. देशभरात शिवव्याख्याते अशी त्यांची ओळख आहे. ते आक्रमक वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी संभाजी ब्रिगेडमध्ये अनेक वर्ष प्रवक्ते म्हणून जबाबदारी देखील पार पाडली. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांच्या मर्जीतले अशी त्यांची ओळख आहे. ते विधानसभा निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक होते.
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना विधानपरिषदेवर संधी, का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता?
भाजपकडून डॉ. गोपछडे, दटके, पडळकर , मोहिते पाटील यांनी भरले अर्ज
भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यांनी काल आपले उमेदवारी अर्जही भरले. भाजपकडून दिग्गजांना डावलत विधानपरिषद निवडणुकीत तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये लिंगायत आणि धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आलं आहे. नांदेडमधून डॉ. अजित गोपछेडे आणि नागपूरचे प्रवीण दटके ओबीसी आहेत, तर सांगलीतले गोपीचंद पडळकर धनगर नेते म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेले रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेता आहेत.
शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे.
काँग्रेसकडूनही दोन उमेदवार मैदानात
विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मराठवाड्यातील दोन नवख्या उमेदवारांची नावे शनिवारी रात्री जाहीर करून उमेदवारांच्या शर्यतीत असलेल्या बड्या नेत्यांची नावे कापली आहेत. काँग्रेसकडून राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेसने आधी फक्त राठोड यांचंच नाव जाहीर केलं, तेव्हा सर्वांना वाटलं निवडणूक बिनविरोध होणार पण प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी साडेआठच्या सुमारास पापा मोदी यांचं नाव जाहीर करुन निवडणुकीत चुरस आणली.
निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
कसं आहे आकड्यांचं गणित
या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.
MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट
महाविकास आघाडीला 174 मतांची गरज
महाविकास आघाडीने 6 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर 29 मतांच्या कोट्यानुसार त्यांना 174 मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा निवडून आणायला महाविकास आघाडीला तीन मतं कमी पडतात. जे लहान पक्ष तटस्थ आहेत त्यांची मतं मिळवून सहावी जागा जिंकता येईल असा काँग्रेसचा दावा आहे. विधानसभेत तीन पक्ष तटस्थ असून त्यांच्याकडे 4 आमदार आहेत. यात एमआयएम 2, मनसे 1 आणि सीपीएम यांच्या एका आमदाराचा समावेश आहे.
Maharashtra MLC Election | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडूनही दोन नावं घोषित, नऊ जागांसाठी दहाजण मैदानात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 May 2020 03:39 PM (IST)
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी दहा उमेदवार सध्यातरी मैदानात आहेत. नावं घोषित झाली असली तरी अजून भाजप वगळता अन्य पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -