मुंबई : विधानपरिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय. दरम्यान शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी रात्री 10 च्या सुमारास बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही थोरातांना उमेदवार मागे घेण्यासाठी केला संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे.


उमेदवार कसा निवडून आणायचा यावर चर्चा होणार असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे सहा उमेदवार आहेत. त्यात काँग्रेसचे दोन आहेत. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. सहा उमेदवार निवडून कसे आणायचे याचे नियोजन सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण,नितीन राऊत आणि सतेज पाटील यांच्यात आज बैठक झाली असून सहाव्या जागेबाबत काँग्रेस अजूनही ठाम असल्याची माहिती आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर काँग्रेस चर्चा करणार आहे, अशी देखील माहिती आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक 

विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून येणे महत्वाचे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार हे अजून निश्चित व्हायचं आहे. मात्र प्रत्यक्षात झाली तर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 27 मे च्या आधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक महत्वाची आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडे असलेलं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा निवडून येऊ शकतात, असा विश्वास काँग्रेसला वाटतो.

कसं आहे आकड्यांचं गणित
या निवडणुकीत विधानसभेतील 288 आमदार मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळ बघितलं तर 1 उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतांचा कोटा आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44 या तीन पक्षांचे मिळून 154 संख्याबळ आहे. तर याशिवाय बच्चू कडूंचा प्रहार 2, स्वाभिमानी 1, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3, सपा 2, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1 आणि अपक्ष 7 असं 17 जणांचं पाठबळ महाविकास आघाडीला आहे. म्हणजेच 154 + 17 असं 171 मतांचं पाठबळ महाविकास आघाडीकडे आहे.

MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट

महाविकास आघाडीला 174 मतांची गरज
महाविकास आघाडीने 6 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर 29 मतांच्या कोट्यानुसार त्यांना 174 मतांची गरज आहे. म्हणजेच सहावी जागा निवडून आणायला महाविकास आघाडीला तीन मतं कमी पडतात. जे लहान पक्ष तटस्थ आहेत त्यांची मतं मिळवून सहावी जागा जिंकता येईल असा काँग्रेसचा दावा आहे. विधानसभेत तीन पक्ष तटस्थ असून त्यांच्याकडे 4 आमदार आहेत. यात एमआयएम 2, मनसे 1 आणि सीपीएम यांच्या एका आमदाराचा समावेश आहे.