मुंबई : भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या या बड्या नेत्यांची नावं सुरुवातीपासून आघाडीवर होती मात्र या सर्वांना डावलून पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी घेतल्याचं दिसून येत आहे.


का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता ?

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून तीन ओबीसी आणि एक मराठा मैदानात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये लिंगायत आणि धनगर समाजाला प्राधान्य देण्यात आलं आहे. नांदेडमधून डॉ. अजित गोपछेडे आणि नागपूरचे प्रवीण दटके ओबीसी आहेत, तर सांगलीतले गोपीचंद पडळकर धनगर नेते म्हणून ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व असलेले रणजितसिंह मोहिते पाटील मराठा नेता आहेत. यातून भाजपचा जातीय आणि प्रादेशिक समतोल टिकवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

विशेष म्हणजे पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या ओबीसी नेतृत्वाला डावलून भाजपकडून नवीन ओबीसी नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याचं या उमेदवारीवरून स्पष्ट होत आहे. तसेच पक्षविरोधी बंडाची भूमिका खपवून घेतली जाणार नाही हा संदेश यातून अधोरेखित होत आहे. मात्र तेली समाजाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाला पक्षात पसंती असूनही त्यांची संधी पुन्हा हुकल्याची भाजपच्या गोटात जोरदार चर्चा आहे.

आता विरोधी पक्षात असलेल्या भाजपला गमावण्यासारखं फार काही नाही. त्यामुळे पक्षातील पहिल्या फळीतील नाराज नेत्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन समांतर नेतृत्व उभं करण्याची भाजपची रणनीती असल्याचं दिसतंय. गोपीनाथ मुंडेंनंतर आता पक्षापेक्षा कुठल्याही नेत्याला मोठं होऊ द्यायचं नाही असे स्पष्ट संकेत यातून दिल्लीतील पक्ष श्रेष्टींनी दिले आहेत.

MLC Election | विधानपरिषदेसाठी भाजपकडून चार नावं निश्चित, दिग्गजांचा पत्ता कट

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी घेतलेल्या मेळाव्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच धनगर समाजातील भाजपमधले राम शिंदे आणि मित्रपक्ष रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा विधानसभा निवडणुकीत भाजपला खूप फायदा झालेला नाही. त्यामुळे त्यांनाही पर्यायी चेहरा उभा करण्यासाठी गोळीचंद पडळकर यांना पसंती मिळालेली आहे. तसेच अजित पवारांना अंगावर घेण्यासाठी पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याची परतफेड त्यांना या विधांपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाने केली आहे.

गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास 

गोपीचंद पडळकर यांनी महादेव जानकर यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षातून राजकारणात प्रवेश केला. पडळकर यांनी 2009 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी खानापूर - आटपाडी विधानसभा मतदारसंघातून रासपचे चिन्हावरून आमदारकी लढवली. धनगर आरक्षणच्या मुद्यावरून पडळकर आक्रमक होते. त्यामुळे धनगर समाजाचे नेते म्हणून त्याची ओळख बनली. पुढे रासपला सोडचिठ्ठी देत ते भाजपमध्ये सहभागी झाले. भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर काम केले. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडले आणि वंचित बहुजन आघाडीत गेले आणि 2019 ची लोकसभा सांगलीतून वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हावर लढवली. त्यावेळी त्यांनी तब्बल साडेतीन लाख मतदान घेतले. 2019मध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून बारामती विधानसभा मतदार संघात अजित पवार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि त्याठिकाणी त्यांचा पराभव झाला.

मुंडे घराण्याचे निकटवर्तीय डॉ. अजित गोपछडे
डॉ. अजित गोपछडे यांची भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार म्हणून घोषणा झालीय. गोपछडे हे अंबाजोगाई इथं वैद्यकीय शिक्षण घेताना संघाच्या संपर्कात आले. ते मुंडे परिवाराचे निकटवर्तीय मानले जातात. संघ आणि आता भाजपचे महत्वाचे नेते शरद कुळकर्णी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने उमेदवारी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. ते भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष देखील आहेत.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय प्रवास

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र व सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू अशी यांची पहिली ओळख. राष्ट्रवादी युवक काँग्रेस मधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना शेकडो बंधारे श्रमदानातून उभारले तर गाव तिथे ग्रंथालयही चळवळ राबवली. संघटन कौशल्य असल्याने आजही संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावत कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. 17 नोव्हेंबर 2003 मध्ये विधानपरिषदेवर बिनविरोध निवड तर 2009 मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून अनुभव.2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. माढा लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देत राष्ट्रवादीला धक्का दिला. यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम सातपुते यांना माळशिरस मतदारसंघातून विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. भाजप प्रवेशानंतर स्वतःला अथवा कार्यकर्त्याला उमेदवारी न मागता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी झालेल्या माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा या जागेवर पक्षाने दिलेला उमेदवाराला निवडून आणून पक्षाचा विश्वास मिळविल्याने रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

गडकरी आणि फडणवीस दोघांचेही खास प्रवीण दटके

सध्या प्रवीण दटके हे महागरपालिकेत नगरसेवक असून नागपूर शहर भाजपचे शहर अध्यक्षही आहेत. दटके यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर प्रवीण दटके यांना पक्षाने नगरसेवक म्हणून संधी दिली होती. त्यानंतर प्रवीण दटके यांनी नगरसेवक म्हणून महानगर पालिकेत भाजपची भूमिका परखडपणे मांडून पक्षात एक आक्रमक युवा नेता अशी प्रतिमा बनवली. भाजपने प्रवीण दटके यांना महापालिकेच्या राजकारणात अनेक वेळा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. महापालिकेत भाजपकडून सत्तापक्ष नेता, जलप्रदाय समिती अध्यक्ष, महापालिकेचे महापौर अशी अनेक पदं दटके यांनी भूषविली. या शिवाय भारतीय जनता युवा मोर्चा मध्येही प्रवीण दटके यांनी शहर अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रवास केला आहे. प्रवीण दटके संघाचे स्वयंसेवक असून संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असते. नागपूरात भाजपमध्ये कार्य करताना प्रवीण दटके यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा विश्वासू कार्यकर्ता अशी प्रतिमा बनविली आहे. त्यामुळे ते दोन्ही प्रमुख नेत्यांच्या खास कार्यकर्त्यांमधील आहेत.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक