Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्याचं न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी निश्चित केलं आहे. तसेच याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावरही गुरूवारी एकत्रित सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. या सर्वांच्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी बुधवारी राज्य सरकारनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला.
कॉग्रेस प्रभारी एच. के पाटील यांचा आज मुंबई दौरा
सह्याद्रीवर झालेल्या कॉग्रेस मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीनंतर आता महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी एच. के पाटील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा येत्या 28 एप्रिलला नियोजित आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील कॉग्रेस नेते आणि मंत्र्यांची भेट घेतील. 22 एप्रिलला एच के पाटील मुंबईत येत आहेत. यावेळी दिल्लीत हायकमांडकडे कॉग्रेस आमदारांची नाराजी, अंतर्गत ताळमेळ, जिल्हास्तरीय जनता दरबार, कॉग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमधील आक्रमक भूमिका याविषयांवर खल होण्याची शक्यता आहे. तसंच राहुल गांधांच्या मुंबई दौऱ्यात राहुल गांधी कोणा कोणाला भेटणार याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
जहांगीरपुरी येथे एमसीडीच्या अतिक्रमणविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
दिल्ली पालिकेच्या तोडक कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर बुल्डोझर चालवला जात आहे. जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तूर्तास स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर आज (गुरुवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे.
दिल्ली हिंसाचाराच्या आरोपींचे बंगाल कनेक्शन
दिल्ली हिंसाचारातील आरोपींच्या बंगाल कनेक्शनसाठी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात दिल्ली पोलिसांच्या पथकाची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे तीन सदस्यीय पथक ही चौकशी करत असून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा बांगलादेशाशी संबंध आहे की, ते बंगालचे रहिवासी आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जात असून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज गुजरातमधून दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. आज गुजरातमध्ये येणारे ब्रिटीश पंतप्रधान गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंधांवर अनेक उद्योगपतींना भेटणार आहेत. जॉन्सन 22 एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या गुजरात-दिल्ली भेटीला ब्रिटनच्या नव्या इंडो-पॅसिफिक धोरणाशीही जोडले जात आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या निम्म्याहून अधिक इंडो-ब्रिटिश नागरिक गुजराती वंशाचे आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सालेमने दावा केला आहे की, पोर्तुगालमधून त्याच्या प्रत्यार्पणात नमूद केलेल्या अटींनुसार भारतातील तुरुंगवास 2027 पेक्षा जास्त असू शकत नाही. या प्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने उत्तर दाखल करताना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाने सालेमच्या सुटकेवर सुनावणी करू नये, असे म्हटले आहे. भल्ला यांनी असेही म्हटले आहे की, त्याच्या सुटकेचा विचार करण्याची वेळ 2030 मध्ये येईल. मग काय करायचे ते सरकार ठरवेल. सकाळी 11.40 वाजता सुनावणी होणार आहे.
'ह्युमन कॉम्प्युटर' शकुंतला देवी यांची पुण्यतिथी
'ह्युमन कॉम्प्युटर' असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांची आज पुण्यतिथी आहे. शकुंतला देवींचा जन्म 1929 मध्ये बंगळूरूमध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1982 साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
हरला तर थेट बाहेर... चेन्नई-मुंबई विजयासाठी मैदानात उतरणार
आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईचा गुरुवारी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईपुढे तगड्या चेन्नईचं आव्हान असेल. मुंबई आणि चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईला पहिल्या सहाही लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सहा सामन्यात चेन्नईचे पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील.
आज इतिहासात
1526: मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यातील पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोदी मारला गेला आणि भारतात मुघल राजवटीचा पाया घातला गेला.
1926: इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक काळ राज्य करण्याचा विक्रम केला आहे.
1938: सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...चे गीतकार प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांचे पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले.
1996: भारतीय हवाई दलाचे अधिकारी संजय थापर यांना पॅराशूटमधून उत्तर ध्रुवावर उतरवण्यात आले.