केशव धारातीर्थी पडले त्यावेळी त्यांची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. मागील आठवड्यातील सोमवारी त्या प्रसुतीसाठी माहेरी जाणार होत्या. मात्र रविवारीच पतीला वीरमरण आल्याचं वृत्त कळलं आणि दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर मंगळवारी मूळगावात शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी झाला.

मुलगा अथवा मुलगी झाले तरी त्याला लष्करात भरती करण्याचं स्वप्न केशव गोसावी यांनी पाहिलं होतं. मात्र मुलीच्या जन्माच्या आठ दिवस आधीच देशाच्या सीमेचे रक्षण करताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं. सर्वस्व हरवून बसलेल्या गोसावी कुटुंबाच्या दु:खावर आठ दिवसांनी मुलीच्या आगमनाने काहीशी फुंकर घातली आहे.
पाकिस्तान लष्कराने 11 नोव्हेंबर रोजी युद्धबंदीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या चकमकीत केशव गोसावी यांना गोळी लागली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरु असताना गोसावी यांचं निधन झालं. गोसावी हे सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर गावचे रहिवासी आहेत. दरम्यान, गोसावी यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 25 लाखाच्या मदतीची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.