पंढरपूर : "मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेसाठी मोठा पाऊस दे, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल," असं साकडं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विठूरायाला घातलं. कार्तिकी एकादशी महासोहळ्यातील विठूरायाची शासकीय महापूजा आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे बुद्रुक गावाच्या बाळासो आणि त्यांची पत्नी आनंदीबाई मेंगाणे याना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. कार्तिकी सोहळ्यासाठी जवळपास सहा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले असून शासकीय महापूजेनंतर पहाटे साडेतीन पासून सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली.
मागील आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात आलं होतं. याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केलं, असं पाटील यांनी सांगितलं. आजवर 70 वर्षात अनेक आयोग आले मात्र मराठा समाजाला कोणीच मागास ठरवले नव्हते, मात्र आम्ही या सर्व अडचणींचा अभ्यास करुन मागास आयोगापुढे कागदपत्रे सादर केल्याने पहिल्यांदाच मराठा समाजाला मागास ठरवण्यात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर या समाजाला न्याय देण्यासाठी कितीही न्यायालयीन लढाया लढायची वेळ आली तरी आम्ही लढू, मात्र मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची तयारी केलीय ज्यामुळे ही वेळच येणार नाही असं सांगितलं.
मागास आयोगाने 30 टक्के मराठा समाज मागास असल्याचं मान्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाची 50 टक्क्यांची अट ओलांडली तरी अडचण येणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळेच एवढ्या प्रयत्नानंतर आता थेट विठूरायालाही साकडे घालून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात यश यावे, अशी प्रार्थना केल्याचंही पाटील म्हणाले.
यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्याचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य परिवहन मंडळाने या दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचे पासही यावेळी सुपूर्द केला. मंदिर समितीला 50 लाखांची देणगी देणारे लातूर इथले बांधकाम व्यावसायिक आर के चव्हाण यांचाही सन्मान यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गेली 25 वर्षे वारी करणारे मेंगाणे दाम्पत्य आजच्या बहुमानामुळे हरखून गेलं होतं. प्रत्येक वर्षी वारीला आल्यावर आपणाला मानाच्या वारकरी होण्याचे भाग्य लाभावे, अशी प्रार्थना हे दाम्पत्य विठूरायाला करत होतं. यंदा मात्र विठूरायाने त्यांची हाक ऐकून शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळवून दिल्याचं या दाम्पत्याने सांगितलं.
दरम्यान आज पहाटे एक वाजल्यापासून पंढरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने भाविकांची तारांबळ उडाली असली तरी या भाविकांनी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.
30 प्रकारच्या फुलांनी विठ्ठल मंदिर सजलं
कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाख भाविक शहरात दाखल झाले असताना पुण्यातील राम जांभूळकर या भक्ताने जगभरातील विविध 30 प्रकारच्या फुलांनी संपूर्ण विठ्ठल मंदिर सजवलं. ही आकर्षक सजावट पाहून दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हरखून जात आहे. विठ्ठल मंदिरात अनेक वेळेला विठ्ठल रुक्मिणी गाभारा, सोळखांबी अशा प्रमुख भागात सजावट केली जाते, मात्र यावेळी जांभुळकर यांनी मंदिराच्या प्रवेशापासून बाहेर पडेपर्यंतच्या मंदिरातील सर्वच भागांना अतिशय कलात्मक रितीने फुलांची सजावट केली आहे.
या सजावटीसाठी पुण्यातून आणलेल्या जर्बेरा, लिलियम, आर्किड, ड्रेसिना, ग्लॅडिओ, अन्चोरियम या सारख्या विदेशी फुलासोबत विविध रंगांचे गुलाब, मोगरा, शेवंती, गुलछडी, झेंडू, कलकत्ता झेंडू, अष्टर अशा देशी फुलांचा वापर करण्यात आला.
विठ्ठल-रुक्मिणीसाठी बंगळुरुवरुन खास पोशाख
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला गेली 40 वर्षे बंगळुरुचा एक भाविक नित्यनेमाने दरवर्षी विठूराया आणि रुक्मिणीसाठी खास पोशाख बनवून आणतो. आजही या भक्ताने कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी बंगळुरु इथून बनवून आणलेला पोशाख मंदिर समितीकडे सुपूर्द केला. एम कामराज असं या भक्ताचं नाव आहे. त्यांचं घराणं विठ्ठल भक्त आहे. देवाच्या कृपेने व्यवसायात मोठी भरभराट झाली. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देवाच्या पोषाखाची सेवा सुरु केली ती आजही कायम आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देवाचे पोशाख बनवताना 7 दिवस कारागीर उपवास ठेवून हे पवित्र काम करतात. अत्यंत रेखीव हस्तकाम असलेल्या आणि सोन्या चांदीचा वापर केलेल्या कांची साड्या रुक्मिणी मातेसाठी कामराज घेऊन येतात. विठूरायाचा पोशाखही अशाच पद्धतीने बनवण्यात येतो.
मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, चंद्रकांत पाटलांचं विठूरायाला साकडं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2018 07:40 AM (IST)
मागील आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखण्यात आलं होतं. याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केलं, असं पाटील यांनी सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -