नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक शाळेने एक राखी वीर जवानांसाठी हा अनोखा उपक्रम आज राबवला. गेल्या सात वर्षांपासून शाळेतील विद्यार्थिनी भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरिटोरीयल 116 रेजिमेंटमधील जवानांसाठी स्वतःच्या हाताने राखी बनवतात आणि बटालियनमध्ये जाऊन ति राखी स्वतःच्या हाताने जवानांना बांधुन रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरे करतात. यावर्षी सुद्धा शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. 


आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह असून भाऊ बहिणीच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. अनेकजण देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना देखील पोस्टाने राखी पाठवत असतात. तर नाशिकमध्ये (nashik) कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक शाळेतील (Cantonment Board Primary School) विद्यार्थिनींकडून गेल्या सात वर्षांपासून एक राखी वीर जवानांसाठी हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. आजच्या रक्षाबंधन निमित्ताने पुन्हा एकदा देवळालीतील लष्करी टी ए बटालियनमधील (Deolali) जवान भारावून गेले. देश रक्षणासाठी त्याग, बलिदान, समर्पण आणि सर्वस्व अर्पण करण्यासाठीं सज्ज असलेल्या लष्करी जवानास स्वहस्ते निर्मित राखीचे रेशमी बंध बांधताना विद्यार्थिनीही भारावून गेल्या. 


देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सैन्य दलातील वीर जवान हे आपले खरे आधारस्तंभ असून आजच्या तरुण पिढीचे खरे स्फूर्तिस्थान असल्याचे प्रतिपादन एक राखी वीर जवानांसाठी या उपक्रम राबविताना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी केले. गेल्या सात वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी भारतीय सैन्य दलातील प्रमुख बटालियन असलेल्या टेरिटोरीयल 116 रेजिमेंट मधील जवानांसाठी स्वतःच्या हाताने राखी बनवतात. ती राखी जवानांना स्वतःच्या हाताने बांधून रक्षाबंधन साजरे करतात. आज रक्षाबंधन निमित्ताने सर्व जवानांचे विद्यार्थिनीकडून औंक्षण करून राखी बांधण्यात आली. आपल्या कुटुंबापासून अनेक महिन्यांपासून दूर राहणारे जवान या सुखद प्रसंगी भारावून गेले होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


विद्यार्थ्यांनींना भारतीय शस्त्रास्राची माहिती... 


यावेळी टी ए बटालियन रेजिमेंटचे मेजर जी.एस.दाजू, सुभेदार सोपान बोराडे, सुभेदार महेंद्र कुमार, हवालदार कटोच या प्रमुख उपस्थितीत सर्व जवानांना  इयत्ता तिसरी-चौथीच्या विद्यार्थिनीच्या हस्ते राख्या बांधण्यात आल्या. देशातील वीर जवानांबद्दल असणारा आदर व प्रेम बघून आम्ही भारावून गेल्याचे मेजर जी.एस.दाजू यांनी सांगितले. तसेच शाळेतील हा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम आम्ही दरवर्षी आमच्या रेजिमेंटमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा सुभेदार सोपान बोराडे यांनी व्यक्त केली. सदर उपक्रमामध्ये सुभेदार सोपान बोराडे यांनी भारतीय सैन्यातील आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे रेजिमेंटची कार्य करण्याची पद्धत याबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. 



इतर महत्वाची बातमी : 


'बाबा' माझा बालविवाह करू नका, रक्षाबंधन निमित्ताने विद्यार्थींनींकडून वडिलांना पत्र; नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम