नाशिक : नाशिक (Nashik) म्हणजे स्वच्छ, सुंदर अन् हरित नाशिक म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुणे, मुंबईचे (Mumbai) लोक नाशिकला पसंती देतात. मात्र आता नाशिकचं वातावरण सुद्धा बिघडत चाललं असून स्वच्छ हवा सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकची घसरण झाली असून देशात नाशिक थेट 21 व्या स्थानी फेकले गेले आहे. तर इंदूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नाशिकला मात्र नव्याने हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र आहे. 


केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (Climate change) मंत्रालयातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे आयोजित स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 (किंवा स्वच्छ हवा सर्वेक्षण) स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. 2026 पर्यंत वायू प्रदूषण 40 टक्यांपर्यंत कमी करण्यासाठी 'एन कॅप' कार्यक्रमांतर्गत शहर-विशिष्ट कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी एकूण 131 शहरांची निवड करण्यात आली होती. या शहरांच्या सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. यात नाशिक शहर एकविसाव्या स्थानावर आहे. त्यावरून शहरातील हवा किती प्रदूषित झाली आहे, हे यावरून निदर्शनास आले. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र यासोबत अनेक घटकांत वाढ झाल्याने नाशिकच्या हवेची गुणवत्ता (Air quality) सध्या ढासळत असल्याचे दिसून येत आहे. 


दरम्यान या स्पर्धेत राज्यातील मुंबई व नागपूरनंतर नाशिकचा 21 वा क्रमांक राहिलेला आहे. या स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम साहित्य विल्हेहाट व्यवस्थ‍ा, रस्त्यावर उडणारी धूळ, ग्रीनरी आणि एनकॅप योजने अंतर्गत वायू प्रदूषण घटविण्यासाठी दिलेला निधीचा वापर हे प्रमुख निकष होते. त्यासाठी दोनशे गुण देण्यात आले होते. त्यात नाशिक महापालिकेला 160 गुण मिळाले. तर एअर क्वालिटी इंडेक्समध्ये 61 गुण मिळाले. सर्वाधिक फटका एन कॅप योजनेअंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आहे. मागील चार वर्षात या योजनेअंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी ऐंशी कोटींचा निधी मिळाला असून जेमतेम वीस कोटी निधीही महापालिकेला खर्च करता आला नाही. एकीकडे अपयश पदरी पडले असताना गतवेळेच्या तुलनेत या स्पर्धेत नाशिकची सुधारणा झाली असून वरचा क्रमांक मिळवला यात धन्यता मानत आहे.


निधी खर्च करण्यात अपयश


प्रदूषण कमी करण्यासाठी 'एन कॅप' योजनेअंतर्गत नाशिक मनपाला ऐंशी कोटींचा निधी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मिळाले. मात्र त्यापैकी बहुतांश योजना अद्याप कागदावरच असून निधी खर्च करण्यात अपयश आल्याने याचा फटका नाशिकला बसला आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिकची घसरण झाली असून केंद्रात नाशिक थेट 21 व्या स्थानी फेकले गेले आहे. त्यात इंदूर शहर प्रथम क्रमांकावर राहीलेला आहे. तर आग्रा शहर दुसर्‍या व ठाणे शहर तिसर्‍या स्थानावर आले आहेत. यंदा अधिक प्रभावी योजना राबवून चांगली कामगिरी केली जाईल. स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत गतवेळेपेक्षा नाशिकची सुधारणा झाली असून 21 वा क्रमांक आल्याचे मनपाचे पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत पुढील वेळेस अधिक चांगली कामगिरी केली जाईल. एन कॅप योजनेचा निधी पुढिल तीन महिन्यात खर्च करण्याच्या सूचना सर्व विभागाना दिल्या आहेत.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Air Quality : नाशिक नुसतं नावालाच भारी, हवा मात्र झालीय खराब! समाधानकारक श्रेणीतून खराब श्रेणीत