पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न (Pune Traffic)  सातत्याने पुढे येत आहे. त्यात चांदणी चौकातील पूल झाल्यापासून त्या पुलावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  यातच आता आमदार सत्यजीत तांबे यांनीदेखील व्हिडीओ शेअर करत पुण्यातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी ट्वीट करुन ट्रॅफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या आहेत आणि वाहतूक कोंडी बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणं, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हटलं आहे. 


सत्यजीत तांबे यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?


सत्यजीत तांबे यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, 'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 397 कोटी खर्च करून 8 रॅम्प, 2 सर्व्हिस रोड, 2 अंडरपास, 4 पूल असे 17 किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की, नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे. नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय.


नागरीकही नाराज


पुणेकर वर्षभरापासून या पुलाचं काम पूर्ण होण्याची वाट बघत होते. वर्षभर या पुलाच्या कामामुळे पुणेकरांचा काहीसा त्रास सहन करावा लागला होता. अनेकदा वेगवेगळ्या मार्गावरची रस्ते बंद ठेवण्यात आली होती. काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून रात्रंदिवस काम सुरु होतं. त्यानंतर हा पूल तयार करुन त्याचं धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आलं मात्र भुलभुलैया तयार झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






 


इतर महत्वाच्या बातम्या :


Nana Patekar : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नाना पाटेकरांनी मुनगंटीवारांना डिवचलं; म्हणाले, "भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पाहा"