जालना :  भाजप (BJP) नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीवरून शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. मात्र, यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना तिथे उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होत असून, धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस मल्हार सेनेकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या युवकास मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध आंदोलन केलं. दरम्यान, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या तरुणास अमानुष मारहाण केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस देणार असल्याची घोषणा करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं आहे.


धनगर आरक्षण कृती समिती आक्रमक, नेमकं काय घडलं? 


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली होती.  


भाजप शहराध्यक्षांनी मागितली माफी


सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्यावरुन शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकला होता. यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होऊ लागला. तर धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या मारहाणी प्रकरणी माफी मागितली आहे.