maharashtra most polluted city : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. फक्त राजधानी दिल्लीच नव्हे तर भारतातील तब्बल 46 शहरांतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे. जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरांमध्ये भारतातील तब्बल 46 शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील प्रदुषित शहरांची देखील यादी समोर आली आहे. यात मुंबई शहर आणि उपनगरांमधील एअर क्वालिटी ढासळली असल्याचं समोर आलं आहे. बीकेसीतील नोव्हेंबरमधील सरासरी एक्यूआय 202 वर म्हणजे वाईट श्रेणीत समावेश झाला असल्याचं समोर आलं आहे.
टॉप 10 शहरांमधील नोव्हेंबर महिन्यातील सरासरी एक्यूआय मध्यम श्रेणीत आहे. मुंबईतील ठिकाणांसह कल्याण, नवी मुंबई आणि पुणे शहरातील ठिकाणांचाही समावेश यात झाला आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये देखील एअर क्वालिटी ढासळली आहे. नोव्हेंबरमधील कोथरुडचा सरासरी एक्यूआय 147 वर आहे.
Polluted Cities : धोका वाढतोय! जगभरातील टॉप 100 प्रदुषित शहरात भारताची तब्बल 46 शहरं
मेट्रोची सुरु असलेली कामं, रस्त्यांवर वाढलेली वाहनांचा संख्या, स्मॉग आणि धुळीच्या एकत्रित परिणामांमुळे परिस्थिती ढासळल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. यामुळं आजारी लोकांना आरोग्यविषयक अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे.
कोणत्या शहरात काय परिस्थिती?
(नोव्हेंबर महिन्यातील सरासरी)
बीकेसी - 202 एक्यूआय
कुलाबा - 176 एक्यूआय
कुर्ला - 165 एक्यूआय
विलेपार्ले - 164 एक्यूआय
माझगाव - 162 एक्यूआय
कोथरुड, पुणे - 147 एक्यूआय
नेरुळ, नवी मुंबई - 146 एक्यूआय
खडकपाडा, कल्याण - 134 एक्यूआय
वरळी - 133 एक्यूआय
महापे, नवी मुंबई - 120 एक्यूआय
हवेची गुणवत्ता कशी तपासली जाते?
पार्टिकुलेट मॅटर (PM) 2.5, PM10, ओजोन, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइडच्या स्तऱाच्या आधारावर हवेची गुणवत्ता तपासली जाते. पार्टिकुलेट मॅटर अत्यंत सूक्ष्म कण आहे, जो आरोग्याला हानी पोहचवतो. हवेत PM 2.5 आणि PM10 असणे अतिशय धोकादायक मानलं जाते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha