नाशिक : भाजप नगरसेविका सीमा ताजने यांच्या पतीनं बिटको रुग्णालयात धुडगूस घातला आहे. नगरसेविका सीमा ताजने यांचे पती राजेंद्र ताजने यांनी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात कार घुसवली. रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर आणि स्ट्रेचरची तोडफोड झाली आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळही केली. यामुळे रुग्णालयाच्या काचा फुटल्या असून अन्य वस्तुंचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मात्र नगरसेविकेच्या पतीनं रुग्णालयाचं नुकसान का केलं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घडलेल्या प्रकारामुळे सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच मनपा आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी तत्काळ घटास्थळी धाव घेत कारवाई केली. तसेच रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. 


शनिवारी संध्याकाळी साधारण 7 ते साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यातील दृश्य थरकाप उडवणारी आहेत. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील काचा फोडून इनोव्हा गाडी राजेंद्र ताजने यांनी रुग्णालयात घुसवली. घडलेल्या प्रकारासंदर्भात एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी राजेंद्र ताजने यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी राजेंद्र ताजने यांच्या वडिलांचं नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात निधन झालं होतं. याच रागातून त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. परंतु, अद्याप त्यांच्या या कृत्यामागील कारण स्पष्ट झालेलं नाही. 


पाहा व्हिडीओ : नाशिकमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीचा उन्माद, इनोव्हा गाडी रुग्णालयात घुसवत धिंगाणा



ज्यावेळी राजेंद्र ताजने यांनी गाडी रुग्णालयात घुसवून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, त्यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्यवस्थापनावरही अनेक गंभीर आरोप केले होते, तसेच त्यांनी गाडीतून उतरल्यावर आपल्या हातातील एक दगड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या दिशेनं भिरकावला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच गाडी रुग्णालयात घुसवल्यानंतर त्यांनी गाडीतून उतरत एका रुग्णाच्या नातेवाईकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, रुग्णाच्या नातेवाईकांनी अशी माहिती एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. 


दरम्यान, नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. राजेंद्र ताजने यांनी केलेल्या या कृत्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अद्याप यामागील कारण काय यासंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :